मुंबई - राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेतल्यानं सरकार अल्पमतात आले. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ सरकार नव्हे तर शिवसेना कुणाची हे दाखवण्याची वेळ आली आहे.
त्यात अनेक आमदार आजही उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि भाजपाशी जुळवून घ्या असा आग्रही सल्ला देत आहेत. यात आता बंडखोर आमदार उदय सामंत यांनी शिवसैनिकांना पत्र लिहिलं आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि वाघाचा फोटो आहे. मात्र उद्धव-आदित्य यांचा फोटो टाळलेला आहे. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? याचा जाहीर खुलासा उदय सामंत यांनी पत्रातून केला आहे.
काय लिहिलंय पत्रात?पत्र प्रपंच एवढ्यासाठीच, काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा, राजापूर व संगमेश्वरचे शिवसैनिक जास्त होते, असो. मेळाव्याची सुरुवात विभाग प्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेत्यांची भाषणे सुरू झाली अनेकांनी मला टोमणे मारले. पण ती काही मंडळी कोण होती? ज्यांनी खा. विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले. काहींनी प्रचाराची पत्रकेदेखील गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही असे जाहीर वर्तमान पत्रातून दिले होते.
माझा कोणावरच राग नाही पण दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांना आपलं मानलं, राजकारणापलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपले अशा व्यक्तीने मला गद्दार, उपरा अजून बरेच काही म्हणणं मला रुचले नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील झालो तो एक शिवसैनिक म्हणूनच. ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला. ज्यांनी बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली. त्या व्यक्तीच्या विरोधात हा उठाव होता. हा उठाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही शिवसेनेला राज्यात चौथ्या क्रमांकावर जावं लागतं त्यासाठी होता. विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांविरोधात हा उठाव होता. जी लोकं उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा फायदा घेत शिवसेना संपवू पाहणाऱ्या वत्तीविरोधात हा उठाव होता. माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता याला गद्दारी म्हणायची की धाडस हे आपणच ठरवा.
आजवरच्या आयुष्यात मी कधीही विकासकामांबाबत राजकारण केले नाही. म्हणूनच सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले हेही माझ्या कुटुंबानेच दिलेले संस्कार आहेत. याच संस्कारातून मी कार्यकर्ते उभे करण्याचा प्रयत्न केला. शासकीय योजनांसह वैयक्तिक पातळीवर मदत करून कार्यकर्ता कायमस्वरुपी उभा राहावा यासाठी मी प्रयत्न केले. हेच माझ्या एवढ्या वर्षातील राजकारणाचे संचित आहे.
मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो. ह्याचे साक्षीदार स्वत: खा. राऊत, अनिल देसाई हे आहेत. ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो त्यांचे नाव मी योग्यवेळी जाहीर करेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसं तिथे होती. हे खासदार विनायक राऊत यांनाही माहिती आहे. तसे त्यांनी मला बोलूनही दाखवले. मी त्यांना दोष देत नाही. ते त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत. मन एकाच विचाराने सुन्न होतं की, कालपर्यंत माझ्या वडिलांना देवमाणूस म्हणणारे, माझ्या आईला लक्ष्मीचा अवतार म्हणणारे, माझ्या मोठ्या भावाला सज्जन म्हणणारे विनायक राऊत उपरा, गद्दार आणि वैयक्तिक बरेच काही बोलले याचे मला दु:ख आहे. पण ते बोलले म्हणून मी बोलणार नाही. त्यांनी मला राजकीय मदत नक्की केली आहे. ती मदत मी राजकीय कितीही मोठा झालो अथवा राजकारणात नसलो तरी विसरणार नाही. कुणाच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून पत्रातून संवाद साधत आहे. घटक पक्षासोबतची अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर आता सांगा माझं काय चुकलं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.