मुंबई : नक्षलवादाच्या आरोपानंतर अंतरिम जामिनावर सुटलेल्या कबीर कला मंचचा विद्रोही कवी सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी ‘नवयान’ या नव्या कलापथकाची घोषणा केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत, दिग्दर्शक आनंद पटवर्धन, आमदार कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास रूपवते आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या पथकाची घोषणा करण्यात आली.या वेळी सचिन माळी म्हणाले की, चार वर्षे नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. त्याआधी दोन वर्षे भूमिगत होतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे संविधानावर विश्वास आहे. याआधी कबीर कला मंचच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होतो. यापुढे ‘नवयान’च्या माध्यमातून ‘विद्रोही महाजलसा’ राज्यासमोर सादर केला जाईल. शाहीर शीतल साठे म्हणाल्या की, जातीअंताचा कार्यक्रम प्रबोधनातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल. संविधानाची मूल्ये लोकांना सांगून समतेचे व्रत पुढे घेऊन जाणार आहे. धमक्यांना न घाबरता राज्यभर प्रबोधन करण्याचा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
विद्रोही कवी, शाहिरांची नवी सुरुवात
By admin | Published: March 28, 2017 3:51 AM