हिंगोली: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर अद्यापही शिवसेना त्या धक्क्यातून सावरताना दिसत नाही. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. या डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कामाला लागले असून, अधिकाधिक सक्रीय होताना पाहायला मिळत आहेत. यातच बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अगदी शेवटी शिंदे गटात सामील झालेले बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, संतोष बांगर यांनी या कारवाईला आव्हान देत पदावरून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे. राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत संधान बांधून सरकार स्थापन केले आहे. सुरुवातीला संतोष बांगर यांनीही शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला होता. नंतर त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत मूळ शिवसेनेला धक्का दिला होता. शिंदे गटात जाण्यापूर्वी मात्र त्यांनी बंडखोरांना आधी ढसाढसा रडून परत येण्याचे आवाहन केले होते. नंतर जिल्हाभर दौरे करून बंडखोरावर वादग्रस्त टीका केली होती. बंडखोरांना त्यांची बायका मुले सोडून जातील, या वक्तव्याने राज्यभर चर्चेत आले होते. मात्र विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी शिंदे गटात सामील होत आपण खऱ्या शिवसेनेसोबत गेल्याचे सांगितले होते.
मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख राहणार
मागील दोन दिवसांपासून आमदार संतोष बांगर यांची भूमिका चांगलीच बदलल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या मुलाखतीमधून चांगलीच स्तुती केली. तसेच ते मास लीडर असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांच्या कार्यालयावरील बॅनरही बदलले आहे. त्यामुळे हिंगोलीत मेळावा घेतल्यानंतरही शिवसेनेने नवा जिल्हाप्रमुख जाहीर केला नव्हता, तो अचानक बांगर यांची भूमिका जास्तच बदलल्याने बांगर यांच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टीचा निर्णय मात्र घेतला आहे. या निर्णयानंतर बांगर अधिकच चवताळले असल्याचे पाहायला मिळत आहे. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे व राहणार आहे. मीच बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा पाईक आहे. माझ्या मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ते शाखाप्रमुख माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार त्यांना नाही, असेही ते म्हणाले.
शिंदे यांच्या स्वागताला कार्यकर्ते नेणार
आमदार संतोष बांगर यांनी आपल्या मतदारसंघातून तसेच जिल्ह्यातून ५० वाहनांद्वारे कार्यकर्ते व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी नेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याची जय्यत तयारी होत असल्याचेही दिसून येत आहे. अनेकांना मुंबईकडे निघण्यासाठी तयार राहण्यास सांगितले जात आहे. हिंगोली येथील विश्रामगृहावरून हा ताफा निघणार आहे.
दरम्यान, बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तानाजी सावंत यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.