मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदारांनी पक्षनेतृत्वाच्या निर्णयाला विरोध करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नकोच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिंदे गटात सहभागी असणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच चालली आहे.
शिवसेनेचे ८ मंत्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे यांनी आतापर्यंत दोनदा राज ठाकरेंना फोन केला आहे. यावेळी राज यांच्या प्रकृतीसोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यामुळे सत्तानाट्यात मनसेची एन्ट्री झाली आहे. शिंदे गटाला विलीनीकरण करायचं असल्यास त्यांच्यासमोर भाजपा, प्रहार यांचा पर्याय होता. परंतु त्यात मनसे हादेखील चांगला पर्याय शिंदे गटाला ठरू शकतो याबाबत चाचपणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
राज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना कंटाळून मी पक्ष सोडल्याचं राज यांनी जाहीर केले होते. त्यानंतर इतक्या वर्षांनी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंड होत असल्याचं समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ३८ आमदार फुटल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता तांत्रिकदृष्ट्या या विलीनीकरण करायचं झाल्यास मनसेमध्ये हा गट समाविष्ट होईल का यावर चर्चा सुरू आहे.
शिंदे गटातील आमदार 'MIM'मध्येही जाऊ शकतो - राऊतशिवसेनेचे बंडखोर आमदार म्हणजे एकनाथ शिंदे गट यांना आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्या तरी पार्टीत विलीन व्हावे लागेल. अशा वेळी ते सारे लोक एमआयएम पक्षातही जाऊ शकतात, ते कम्युनिस्ट पक्षातही जाऊ शकतात, ते समाजवादी पार्टीतही जाऊ शकतात. त्यांना मनसे मध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. अशा गोष्टींमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. पण ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत विधान केले.