अहमदनगर/मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ससाणे यांना माघार घेण्याचे आदेश काँग्रेसकडून देण्यात आले. पक्षादेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे नगरमध्ये पक्षाने मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील राजकारणात काही राजकीय तडजोडी झाल्या. यात नगरची जागा राष्ट्रवादीला गेली. पक्षाला मानणारा कार्यकर्ता असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. राज्याच्या राजकारणात पक्षाने माझा वापर केला असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ससाणे शेवटी म्हणाले.नगरमधून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला असला तरी मुंबईत काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तर कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार महादेवराव महाडिक निवडणूक रिंगणात आहेत. महाडिक यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले असले, तरी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इथे काँग्रेसमध्येच लढत होत आहे.
काँग्रेसचे बंडखोर ससाणे यांची माघार
By admin | Published: December 22, 2015 2:37 AM