एकदा कुठल्या राजकीय पक्षांची धोरणं आणि तत्त्वं पटली की आयुष्यभर त्याच पक्षात राहण्याचे दिवस आता मागे पडले. तिकीट मिळालं नाही की बंडाचं अस्त्र उपसलं जातं. हा अनुभव आता सर्वच पक्ष घेत आहेत. पक्षाने केलेला अन्याय, अतिमहत्त्वाकांक्षा, कधी उपद्रवमूल्य दाखवण्याची संधी अशा वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या बंडाविषयी राजकीय पक्षांची मतं...गदारोळातही भाजपाने वेगळेपण जपलं...भारतीय जनता पार्टीसाठी यंदाच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक अर्थाने वेगळ्या आहेत. समाजातील सर्व स्तरांतून लोकांचा पक्षाकडे ओघ वाढला आहे. अन्य राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक संघटना आणि अगदी राजकारणापासून दूर राहिलेली मंडळीसुद्धा भाजपात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विकासाची दिशा पकडली आहे त्यात स्वत:चा खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने पक्षात लोक दाखल होत आहेत. त्यामुळे साहजिकच काल जिथे आमच्याकडे उमेदवारही नव्हता अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इच्छुक तयार झाले आहेत. इच्छुकांची संख्या वाढली तरी जागा मात्र तितक्याच असतात. उमेदवारी एकालाच द्यावी लागते. मुंबईतच २२७ जागांसाठी अडीच हजारांहून अधिक जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, उमेदवार निवडीची भाजपाची प्रक्रिया निश्चित आहे. कोणी एक व्यक्ती, नेता उमेदवार ठरवत नाही. सामूहिक प्रक्रियेतून निवड केली जाते. मंडल स्तरापासून संसदीय मंडळापर्यंत याबाबत चर्चा होते. या निवड मंडळामध्ये महिला, दलित, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचे प्रतिनिधी असतात. शिवाय, या वेळी आम्ही सर्वेक्षणाचादेखील आधार घेतला. विजयाची खात्री असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त होती तरीही तुलनेने भाजपात कमी बंडखोरी झाली. पारदर्शक निवड प्रक्रियेनंतरही काही ठिकाणी नाराजी निर्माण झाली. लोकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. मात्र भाजपात नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पारिवारिक संबंध आहेत. चर्चेद्वारे समजूत काढल्यानंतर जवळपास ९० टक्के बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काही ठिकाणी बाहेरचे लोक आले आणि त्यांना संधी दिली म्हणून नाराजी निर्माण झाली. कठीण काळात आम्ही पक्ष वाढविला आणि आता बाहेरच्यांना संधी का, हा जुन्या कार्यकर्त्यांचा प्रश्न रास्त आहे. पण पक्ष संघटना प्रवाही असते. नवे लोक, घटक पक्षात येतात. पक्षाची वैचारिक चौकट आणि परंपरा आत्मसात करतात आणि आज बाहेरचे वाटणारेच उद्या पक्षाचे आधारस्तंभ होतात. तरीही नवीन कार्यकर्ते आणि जुनी संघटना, कार्यकर्ते यांच्या समन्वयातून प्रवास चालू राहतो. ही काही अचानक घडणारी प्रक्रिया नाही. सातत्याने ती घडत असते. मुळात भाजपाचा कार्यकर्ता वैचारिक बैठक असणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता संवेदनशील असतो. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी झाली तरी ती तत्कालिक बाब असते. एखाद दोन दिवसांत तो पुन्हा आपल्या विचारांसाठी, कार्यासाठी तयार होतो आणि पक्षाच्या विजयासाठी कामाला लागतो. त्यामुळे यंदाच्या राजकीय गदारोळातही भाजपाने आपले वेगळेपण आणि वैचारिक प्रतिष्ठा जपली आहे. - केशव उपाध्ये, भाजपा प्रवक्ताबंडखोरीतून संघटन मजबुतीकडे...शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देण्याचे अपयशी प्रयत्न केले. अगदी संस्थापकांपैकी एक असणारेही त्यात होते. मात्र, शिवसेना मानणारा सामान्य नागरिक आणि शिवसैनिक शिवसेनेच्या विचारांबरोबरच एकनिष्ठ राहिला, हे वास्तव आहे. मुंबईच्या २२७ जागांचा विचार करता पक्षात झालेली बंडखोरी अगदी तुरळक म्हणावी अशी आहे. ज्या २६ जणांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, त्यातील काही मुंबईबाहेरचे आहेत. ७ फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तेव्हा उत्साहात बंडखोरी करणाऱ्यांना आता वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. व्यक्तिनिष्ठ केंद्रीकरणाच्या प्रयत्नातून ज्यांनी बंडखोरी केली त्यांना निवडणुकीनंतर आपण एकटेच आहोत याचे भान आलेले असेल. पक्षाचा स्वत:चा जनाधार आहे त्याला एकनिष्ठ मतदार लाभला आहे. त्यामुळे काही काळापुरते स्थानिक पातळीवर वातावरण कलुषित करण्यापलीकडे बंडखोरी करणाऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. आजवर अनेकांनी व्यक्तिगत आणि सामूहिकपणे शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. काही हितशत्रूंनी तर अफवांची पुडी सोडण्याचा खेळ वारंवार केला. आताही काही अतिहुशार ज्येष्ठ शिवसेना फुटणार वगैरे पुडी सोडत असतात. शिवसेनेबाबत जाणीवपूर्वक अशी मोहीम चालविण्याचा छंदच काही मंडळींना जडलेला आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी एखाद्या नाटकाचा प्रयोग करावा तसे शिवसेनेतील बंडखोरी वगैरे प्रयोग माध्यमांना हाताशी धरून केले जातात. मात्र मुद्दाम पसरविल्या जाणाऱ्या अफवांना, हितशत्रूंच्या अशा मोहिमांना अर्थ नसल्याचे लोकांच्या लक्षात आलेले आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वीही शिवसेना खासदार फुटणार अशी पुडी सोडण्यात आली. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. उलट तीच मंडळी पुढे संसदेत, विधिमंडळात जोमाने काम करत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. प्रत्येक वेळी शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीची पुडी सोडणाऱ्यांची नजर काही मलिदा मिळतो का, याकडे असते. शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचे एक मोठे मधाचे पोळे आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने या पोळ्याचे छोटे छोटे कप्पे घडवत ती बनवली आहे. मधाच्या या पोळ्यावर हात मारून कष्ट न करता, सत्तेचा मध आयता चाखता येतो का, या हेतूनेच शिवसेनेचे हितशत्रू प्रयत्न करीत असतात. या मंडळींनी आजवर असे अनेक प्रयत्न, प्रयोग केले. मात्र, शिवसेना त्यातून अधिक शक्तिशाली बनूनच बाहेर आली. गैरसमज पसरविणारे बोलत असतात त्यामुळे त्यांचा आवाज कानावर पडतो. मात्र, शिवसेनेवर निष्ठा असणारा जनसमुदाय न बोलता सारे ऐकत, पाहत असतो. तो पक्षाची शिस्त मानतो. तो न बोलता कृतीतून व्यक्त होतो. शिवसेनेची स्वत:ची संघटनात्मक रचना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक उपनेते अशी एकमेकांना आधार देणारी साखळी आहे. यातील एखादा दुवा निखळला तरी अन्य घटक स्थिती सावरून घेतात. शिवसेनेत तिकीट देताना अनेक बाबींची खातरजमा केली जाते. चार महत्त्वाचे लोक बोलतात म्हणून तिकीट दिले जात नाही. दोनदा संधी मिळाली म्हणून तिसऱ्यांदा द्या अथवा माझ्या घरच्यांना द्या, अशी मक्तेदारी इथे नाही. सत्तेचे केंद्रीकरण आणि गटबाजीपेक्षा शिवसेनेला प्राधान्य देणाऱ्याला संधी दिली जाते. नाराजी असेल तर मातोश्रीवर बोलावून म्हणणे ऐकले जाते. त्याचा विचार होतो. त्यामुळे शिवसैनिकही हक्काने आपले मत मांडतो आणि पक्षाच्या कामाला लागतो. त्यामुळे बंडखोरी हा केवळ निवडणुकीपुरता उपचार नाही तर संघटना मजबुतीची प्रक्रिया असते. - आमदार नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्ताबंडखोरांना कायमचा रामराम...मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेससमोर बंडखोरीची मोठी समस्या उभी राहिली, अशी स्थिती नाही. दिंडोशी, वरळी व प्रभादेवी भागात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर बंडखोरी झाली. अशा बंडखोरांना आम्ही तातडीने पक्षातून निलंबित केले. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य पक्षांच्या पुढे जात महिनाभर आधीच निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यामुळे आम्हाला पुरेसा अवधी मिळाला. उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर झाली तेव्हा तर बंडखोरी, नाराजी असा काही प्रकार घडला नाही. शेवटची यादी जाहीर केल्यानंतर १५-१६ ठिकाणी बंडखोरी, नाराजी दिसून आली. त्यानंतर संबंधितांशी मी स्वत: चर्चा केली, त्यांची समजूत काढली. त्यामुळे ७-८ ठिकाणच्या बंडखोरांनी माघार घेतली. यानंतरही ज्यांची बंडखोरी कायम आहे त्यांच्यावर आम्ही कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोरीची झळ कमी बसली अथवा जिथे झाली तिथे तात्पुरती मलमपट्टी करून, हा विषय सोडून देण्याचा आमचा मानस नाही. अनेकदा निवडणूक प्रक्रियेत बंडाचा झेंडा पाहिला जातो. पण पक्षाच्या पदावर राहूनही काम न करणारी मंडळी असतात. पदावर राहून केलेल्या या बंडखोरांचा निपटारा करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी शिस्तपालन समितीने अशा घटकांचा शोध सुरू केला आहे. आतापर्यंत जवळपास पंधरा जणांना समितीने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांनी दोन दिवसांत खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही ठिकाणी निवडणुकीच्या काळात स्वत:च्या फायद्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी बंडखोरी करतात. निवडणूक संपली की पुन्हा हीच मंडळी पक्षाच्या व्यासपीठावर दिसू लागतात. त्यांच्या या उचापतींमध्ये सामान्य कार्यकर्ता मात्र मागेच राहतो. या वेळी या निवडणुकीत असे प्रकार करणाऱ्यांची एक यादीच आम्ही तयार करीत आहोत. ही यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविली जाईल. जेणेकरून आगामी काळात अशा मंडळींचे उपद्व्याप थांबवता येतील आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल.निवडणूक आली की इकडून तिकडे, तिकडून इकडे असा प्रवास सुरू होतोच. मुंबई राष्ट्रवादीतही काही मंडळी आली. विशेषत: काँग्रेसमधून दोन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीत आले. सुदैवाने त्या भागात बंडखोरी अथवा नाराजीचे प्रकार समोर आले नाहीत. परंतु आता पक्षात येणारे किती काळ सोबत करतील, त्यांची पक्षाशी, पक्षाच्या ध्येयधोरणांशी निष्ठा जोखावी लागणार आहे. अन्य पक्षांतील स्थानिक कार्यकर्त्याला, दुसऱ्या फळीतील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्य दिसत आहे. त्यामुळे केवळ तत्कालीन गरज, निवडणुकीच्या डावपेचापुढे जाऊन आम्ही हा विषय हाताळत आहोत. पक्षात केवळ आयारामांची संख्या वाढवून खोगीर भरती करण्यापेक्षा आगामी काळातील मजूबत पक्षबांधणीचे दूरगामी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. तूर्तास बंडखोरांना कायमचा रामराम ठोकण्याचा आमचा निर्णय आहे.- सचिन अहिर, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस ही तर शुद्धीकरणाची प्रक्रिया...निवडणुका आल्या की, या पक्षातून त्या पक्षात, तिकडून इकडे, इकडून तिकडे हा आवागमनाचा खेळ आता सामान्य झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांना ते अंगवळणी पडले आहे. राजकीय जीवनाचा भागच बनला आहे. पण काँग्रेसपुरते बोलायचे झाले तर आम्हाला एक विचारधारा आहे. राजकीय विचारधारा, कार्यक्रम आणि कार्यकर्त्याच्या जोरावर चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालखंडात सोडून जाणाऱ्यांचा काँग्रेसवर फारसा परिणाम होत नाही. २०१४ सालच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर ज्यांना सत्तेच्या व सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहायचे आहे, अशी मंडळी बाहेर गेली. मात्र यातूनही जी मंडळी पक्षात राहिली, पक्षासोबत आहेत त्या निष्ठावंतांच्या जोरावरच काँग्रेस आपल्या समोरील आव्हानांना सामोरे जाईल. देशातील वातावरण बदलत आहे. निष्ठावंत काँग्रेसी कार्यकर्त्यांच्या हाकेला लोक प्रतिसाद देत आहेत. सध्याच्या सत्ताधारी पक्षाने राजकारणाचा बाजारच मांडला आहे. जगातील सर्वात मोठी संघटना म्हणविणाऱ्यांना स्वपक्षातील उमेदवारही मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच अन्य पक्षांतील शक्तिशाली लोकांना फोडून त्यांना लालूच देऊन स्वत:कडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही त्या पक्षाच्या राजकीय अध:पतनाची प्रक्रिया आहे. मात्र, अशा परिस्थितीतही खरा निष्ठावंत पक्ष सोडत नाही. काही लोकांनी बंडखोरी केली. काँग्रेसी विचारधारा आणि परंपरेचा पाईक असणारा कार्यकर्ता पक्षातच राहिला. त्याने त्याच्याशी प्रतारणा केली नाही. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेसमध्ये आपसूकच शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडत आहे. हा पराभवही काँग्रेसला खूप काही शिकवण देत आहे. ज्या जनतेने आम्हाला सत्ता बहाल केली त्यांनीच आमच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त केला. तो त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे. सत्तेच्या भोवती हवशे, नवशे, गवशे जमा होत असतात. अनेकदा संधीसाधू मंडळी लाभ घेऊन जातात आणि पक्षातील साधू मंडळींवर अन्याय होतो. मात्र, मागच्या चुका पुढील काळात होणार नाहीत यासाठी पक्ष नेतृत्वाच्या स्तरावर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पराभवातून मिळालेल्या शिकवणीचा विचार होत त्यावर आधारीत पक्षबांधणी होत आहे.एकच जागा आणि अनेक उमेदवार, यामुळे काही बंडखोरी अथवा मतभेदांमुळे नाराजी स्वाभाविक आहे. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही असल्याने मतभेदांना इथे जागा आहे. पक्षाच्या व्यासपीठावर, योग्य ठिकाणी मतभेद व्यक्तही होत असतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नसते, याची जाणीव आम्हाला आहे. एखाद्या नेत्याला दुसराच एखादा उमेदवार योग्य वाटत असतो, काहींना स्वत:च्या समर्थकांना, साथीदारांना संधी द्यायची असते. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका योग्यही असते. मात्र, पक्ष म्हणून एक निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा थोडीशी नाराजी झाली तरी नंतर सर्व नेते एकदिलाने कामाला लागतात. यंदाही तसेच होईल. सर्वच नेते कामाला लागले आहेत. त्वेषाने ते सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा परिवर्तन पाहायला मिळेल.- सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस आणिप्रवक्ता, काँग्रेस
--------------------
शब्दांकन - गौरीशंकर घाळे.