मुंबईः मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. एबीपी माझाशी बातचीत करताना त्या बोलत होत्या. मी भाजपाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलेलं आहे. भाजपा सोडत असल्याच्या अफवांमुळे व्यथित आहे. मी यासंदर्भात 12 डिसेंबर रोजी बोलणार आहे. तेव्हा मी काय ते स्पष्ट करेन, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.मला आता घर बदलायचं आहे. मी म्हटलं होतं 12 डिसेंबरला बोलेन, मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. आताच त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य होणार नाही. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. काही वृत्तपत्रांनी मी पक्ष सोडणार अश्या बातम्या लावल्या होत्या, त्यामुळे फारच दुखी झाले. मला कुठलं पद मिळू नये का, यासाठी हे सगळं चाललं तर नाही ना, असा मला प्रश्न पडतो आहे. मी खूपच व्यथित आहे. मी मुख्यमंत्री होणार अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या.मग जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री अशादेखील बातम्या छापल्या होत्या. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी सभा घेत होते. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, कधीही कुठलं पद स्वीकारण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतनाची आणि आपल्या लोकांशी काय बोलायचं आहे, यासाठी वेळ नक्कीच दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज आहेत का?, असतील तर कोणावर आणि कशासाठी नाराज आहेत?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली होती. ती जाणून घ्यायची असतील तर मागे जावे लागेल.
भाजपा सोडण्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 6:47 PM