- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : १९९५ साली काँग्रेस पक्षात प्रचंड बंडखोरी झाल्यामुळे कॉँग्रेसचे फक्त ८० आमदार निवडून आले आणि अपक्षांच्या पाठिंब्याने राज्यात युती सरकार सत्तेवर आले. यावेळी अशीच परिस्थिती आहे. भाजपा-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. ५१ तुल्यबळ बंडखोरांनी युतीच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले आहे. आमच्याकडचे लोक घेऊनही त्यांना विजयाची खात्री नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या डझनावर सभांची गरज निर्माण झाली आहे, निकालानंतर राज्यात सत्ताबदल झालेला दिसेल, असा विश्वास राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील निवासस्थानी पवार यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. खा. शरद पवार यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल केले. त्याचा उद्रेक राज्यभर आहे. आम्हाला फिरताना ग्रामीण भागातील लोक भाजपने असे दुष्टपणे वागायला व्हायला नको होते असे सांगतात. तो रागही मतपेटीतून आलेला दिसेल, असा दावाही पवार यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीनंतर शरद पवार यांचे राजकारण संपलेले असेल असे विधान केले आहे, यावर अजित पवार म्हणाले, ज्यांना स्वत: निवडून येण्यासाठी आपल्याच पक्षातल्या एका आमदाराचा मतदार संघ सुरक्षित आहे म्हणून घ्यावा वाटतो, त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल न बोललेले बरे. शरद पवार अजून बऱ्याच जणांना पुरून उरणार आहेत, त्यांच्या राजकारणावर बोलणाऱ्यांनी तुल्यबळ लढत होईल असा मतदारसंघ निवडला असता तर बरे झाले असते अशी टिपणीही त्यांनी केली.
प्रश्न : भाजपने ३७० कलमावर भर दिला आहे. तुमच्याकडे कोणते मुद्दे आहेत?उत्तर : जे झाले त्याचे आम्ही अभिनंदन केले आहे. मात्र ही राज्यातली निवडणूक आहे. या लोकांनी आधी पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते सांगावे? किती कोटींची गुंतवणूक आली हे पुराव्यानिशी सांगावे, किती नवीन नोकºया पाच वर्षात आल्या ते सांगावे. अच्छे दिन आनेवाले है म्हणणाºयांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कारखानदारी बंद पडली आहे. शेतमालाला हमी भाव नाही. आमच्या काळात उत्पादक-ग्राहक समन्वय साधून मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ साधला जायचा त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांना फायदा व्हायचा. मात्र, या सरकारला ते जमत नाही. भाव मिळत नसल्याने अनेकांना दूध व्यवसाय सोडावा लागला आहे. राज्य दिवाळखोरीत निघत आहे. बॅँका बुडत आहेत. व्याजदर कमी केल्याने पेन्शनरांचे उत्पन्न कमी होत आहे. या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी त्यांनी दुसरे विषय हातात घेतले आहेत.
प्रश्न : शरद पवार यांच्या ईडी प्रकरणानंतर अचानक तुम्ही राजीनामा दिला आणि सगळा फोकस बदलला. तुमचे टायमिंग चुकले असे वाटत नाही का?उत्तर : राजकारणात ज्याला फायदा मिळवायचा असतो तोच टायमिंग साधतो. माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की मी टायमिंग वगैरे पाहत नाही. राज्य सहकारी बॅँकेत मी संचालक नसतो तर या प्रकरणात शरद पवार यांचेही नाव आले नसते. ज्यांच्यामुळे आपण राजकारणात आलो त्यांचीच नाहक बदनामी झाली. त्यामुळे माझ्या सदसदविवेकबुध्दीने मी तो निर्णय घेतला. मात्र, वडीलकीच्या नात्याने शरद पवार यांनी समजावून सांगितले. त्यामुळेच पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना माझे मन भरून आले. मी त्या भावना कंट्रोल करायला हव्या होत्या पण नाही झाल्या...
प्रश्न : तुमचे नातेवाईक पक्ष सोडून का गेले ?उत्तर : राजकारणात नातीगोती पहायची नसतात. कर्तृत्व पाहायचे असते. राणा जगजितसिंह भाजपात गेले. त्यामागची कारणे त्यांनी मला सांगितली, ती जाहीर करावीत असे मला वाटत नाही. काही गोष्टी घरात ठेवायच्या असतात. गेलेल्यांबद्दल दु:ख आहे. सुख-दु:खात आम्ही एकमेंकांना साथ दिली आहे. त्यामुळेच मी त्यांच्यावर टीका करत नाही. मला बेरजेचे राजकारण करायचे आहे.शरद पवार ‘त्यांना’ आधी पोहोचवतील!भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘या निवडणुकीनंतर पवारांचे राजकारण संपेल’ असे विधान केले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांनी असे बोलणे बरे नाही. पवारांना अजून अनेकांना पोहोचवायचे आहे हे चंद्रकांत पाटील यांनी लक्षात ठेवावे. त्यांना जुना इतिहास माहिती नसेल म्हणून सांगतो, २००४ च्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांना दुर्धर आजाराने गाठले होते. डॉक्टर म्हणत होते, ऐकेक दिवस महत्वाचा आहे, फार उशीर करू नका. त्यावेळीही पवारांनी ‘आजाराला आधी पोहचवेन मग मी जाईल.’ असे सुनावले होते. त्या आजारातूनही ते सहीसलामत बाहेर आले. त्यामुळे आधी चंद्रकांत पाटील यांनी इतिहास पहावा, मगच विधाने करावीत असेही अजित पवार म्हणाले.