- सुधीर महाजनराठवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती राजकीय प्रयोगशाळा आहे. विरोधाभास असा की, निजामशाहीच्या मानसिकतेत असूनही मराठवाड्याइतके राजकीय प्रयोग राज्यात इतरत्र कोठेच झाले नाहीत. पु.लो.द.चा प्रयोग संपल्यानंतर ८० च्या दशकात शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचा प्रयोग येथेच केला. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईबाहेर शिवसेना नेताना ती प्रथम मराठवाड्यातच आणली. खरे तर त्यांनी हा प्रयोग कोकणात केला नाही? प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा पहिला प्रयोग किनवटमध्ये भीमराव केरामांच्या रूपात होता. सामाजिक प्रयोगाचा विचार केला, तर समतेच्या लढ्यात मैलाचा दगड ठरलेले ‘नामांतर आंदोलन’ जसे मराठवाड्याचे तसे आरक्षणाच्या मुद्यावर गाजलेल्या ‘मराठा आंदोलनांची’ सुरुवातही येथूनच झाली.
यावेळी युती असल्याने आपला आकडा वाढवण्याची संधी दोन्ही पक्षांना नाही. राज्यभर युतीचीच हवा गरम असताना जास्तीत जास्त जागा खिशात घालण्याची तयारी चालली असताना युतीलाच बंडखोरीच्या लष्करी अळीने पोखरले आहे. या दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. हे भाजपची पक्ष शिस्त संपल्याचे, तसेच सेनेचा धाक उरला नसल्याचे संकेत मानायचे का, असा प्रश्न आहे. या आडून दुसरा मुद्दा पुढे येतो म्हणजे, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी नव्हे, तर हे पायात पाय घालण्याचे राजकारण खेळले गेले नसणार? राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही.
नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली. गेल्या निवडणुकीत ते हेमंत पाटलांच्या विरोधात फार कमी मतांनी पराभूत झाले होते. आता या कंदकुर्तेंना भाजपमधूनच उघडउघड रसद मिळते. आमदारपुत्रच प्रचारात सहभागी होतात यावरून सगळे लक्षात येते. हदगावमध्ये नागेश पाटील आष्टीकर या सेनेच्या उमेदवाराविरुद्ध सेनेच्याच बाबूराव कदमांनी बंडखोरी केली. लोहा मतदारसंघात तर ही हाणामारी अधिक गडद झाली. भाजप आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हा परंपरागत मतदारसंघ. ते शिवसेनेतून भाजपमध्ये आले म्हणून या मतदारसंघासाठी भाजपने आग्रह धरला होता. सेनेने तो सोडला नाही. तेथे चिखलीकरांनी सेनेचे मुक्तेश्वर धोंडगेच्या विरोधात आपले मेहुणे आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदेंना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उभे केले.
बंडखोरीची ही साथ परभणीतही पसरली. या जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात भाजपचे मोहन फड यांच्या विरोधात सेनेचे जगदीश शिंदे यांनी बंडखोरी केली. फड हे गेल्यावेळी सेनेच्या मीराताई रेंगे यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी पुढे सेनेत प्रवेश केला; परंतु सेनेचे खा. बंडू जाधवांशी मतभेद झाल्याने ते भाजपवासी झाले आणि त्यांच्यासाठी भाजपनेही ही जागा मागून घेतली. शेजारच्या गंगाखेडमध्ये शिवसेनेचे विशाल कदम आणि रा.स.प.चे रत्नाकर गुट्टे यांची लढत आहे. गंमत म्हणजे हे दोन्ही युतीमधील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना, तर जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकरांविरुद्ध शिवसेनेचे राम खराबे यांनी बंडखोरी केली.
बंडखोरीची ही लागण शेजारच्या हिंगोलीमध्येही झाली. वसमतमध्ये सेनेचे जयप्रकाश मुंदडा यांच्या विरोधात अपक्ष अॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली. जाधव हे भाजपचे आहेत. कळमनुरीमध्ये काँग्रेसचे संतोष तारफे यांच्या विरोधात अजित मगर हे वंचित आघाडीकडून मैदानात उतरले. या दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचितने अडचण निर्माण केल्याचे चित्र आहे. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली. तेथे काँग्रेसचे बसवराज पाटील असले तरी जि.प.चे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी पवारांच्या विरोधात बंडखोरी केली, तर उस्मानाबादेत सेनेच्या कैलास पाटलांच्या विरोधात सेनेचेच अजित पिंगळे उतरले, तर परंडामध्ये सेनेच्या तानाजी सावंतांना त्यांच्याच पक्षाच्या सुरेश कांबळेंनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन विरोध केला. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये शिवसेनेचे विजयसिंह पंडित यांच्या विरोधात त्यांचेच काका बदामराव पंडितांनी बंडखोरी केली.
बदामराव हे शिवसेनेचे माजी मंत्री आणि दोन वेळा अपक्ष आमदार होते. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी केली, तर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली. सत्तारांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता आणि मतदारसंघही भाजपचा होता; पण तो सेनेला दिला. त्यामुळे भाजप बंडखोर नेते काँग्रेसचे प्रभाकर पालोदकरांच्या पाठीमागे उभे राहिले आणि पालोदकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. बंडोबांचा हा त्रास सत्ताधारी सेना-भाजप यांनाच मोठ्या प्रमाणावर दिसतो. यावरून सत्ताधारी पक्षातील खदखद बाहेर आली आहे आणि पक्षशिस्त, धाक, दरारा यांना फारसे कोणी घाबरलेले नाही.
दिग्गजांचे भवितव्य पणालाग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत राज्यात लक्षवेधी समजली जाते. याशिवाय जालन्यात रोहयो राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल. फुलंब्रीतून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे, तर सिल्लोडमध्ये सेनेचे अब्दुल सत्तार आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर या लढती लक्षवेधक ठरतील. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भोकरमधून लढत आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे अनुक्रमे लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघातून लढत आहेत.