बीड : देशातील स्त्रिया, बहुजन व कष्टकरी या तीन घटकांसाठी भगवी राजवट धोकादायक असून, भगव्या विचारांना विद्रोही एकजूट पराभूत करेल, असे प्रतिपादन 12व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी यांनी केले. दोन दिवस चालणा:या या संमेलनाचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी बेंगलोर येथील साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसराला क्रांतीसिंह नाना पाटील नगरी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी शहरातून शोभायात्रही काढण्यात आली.
या वेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, वाहरू सोनवणो, संदेश भंडारे, डॉ. बाबुराव गुरव, गौतम कांबळे, कॉ. नामदेव चव्हाण, एकनाथ आव्हाड यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे उद्घाटन मशाल पेटवून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.डॉ. बोधी म्हणाल्या, सध्याच्या काळात स्त्री अत्याचार वाढले आहेत, जातीय भेदभाव सुरूच आहेत. कष्टकरी वर्गासमोर सत्ता परिवर्तन झाले तरी समस्यांचा डोंगर जशास तसा आहे. या तिन्ही घटकांतील लोकांचे संरक्षण धोक्यात आले आहे. या वेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकार व राष्ट्रीय स्वयंसंघावर त्यांनी टीका केली. या वेळी स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, कॉ. नामदेव चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणो झाली. संमेलनासाठी सातारा, सांगली, धुळे, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह इतर जिल्ह्यांतून साहित्यिकांची उपस्थिती होतीे. (प्रतिनिधी)