अर्जुनी/मोरगाव : अंगणवाडीच्या पुरक पोषण आहारात फिनाईलसारखा द्रव टाकून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पती-पत्नीमधील भांडणाचा राग काढण्याचा प्रयत्न तालुक्यातील तिडका/पवनी येथे घडली. मात्र वेळीच आहाराला उग्र वास आल्याने बालकांना ते अन्न दिल्या गेले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारला सकाळी १० वाजता घडली. या प्रकरणाची तक्रार चिचगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, प्रत्येक गावात अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांना शासनातर्फे पुरक पोषण आहार दिला जातो. काही गावात बचत गटांना तर काही गावात अंगणवाडी शिक्षिका हा आहार शिजवितात. तिडका येथे शुक्रवारला सकाळी १० वाजता शिक्षिका एकादशी बाबुराव डोंगरवार यांनी स्वत:च्या घरी अंगणवाडीतील बालकांसाठी खिचडी शिजविली. त्यावेळी शिक्षीकेचा पती घरी झोपलेला होता. तिने तयार केलेली खिचडी अंगणवाडीत आणली. तो आहार वाटप करण्यापूर्वी संशय आल्याने तिने मदतनिस महिलेला खिचडीच्या गंजावरचे झाकण उघडण्यास सांगितले. झाकण उघडताच उग्र वास येऊ लागला. बघता बघता ही वार्ता गावात पसरली.गावकरी अंगणवाडीत आले. सर्वत्र फिनाईलसारखा वास येत होता. लगेच गावातील प्रतिष्ठित मंडळी जमा झाली. उपसरपंच वासुदेव सोनकलंगी यांनी ही माहिती धाबेपवनीचे सरपंच भांडारकर यांना दिली. त्यांनी चिचगड पोलिसांना कळविले. तातडीने पोलीस चमू तिडका येथे पोहोचली. गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे, पंचायत समितीचे सभापती तानेश ताराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार, पं.स. सदस्य किशोर तरोणे आदी तिडका येथे पोहोचले. तत्पूर्वी डॉ. गुज्जनवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवनी येथील वैद्यकीय चमू तेथे पाठविली होती. सुदैवाने हे आहार बालकांना देण्यात आले नसल्याचे कळले. पोलीस व आरोग्य विभागाने आहाराचे नमूने घेतले व ते न्याय वैधक विभाग नागपूर येथे परिक्षणासाठी पाठविले. दरम्यान जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी साबळे यांनी त्या शिक्षिकेवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले.यासंदर्भातर अधिक माहिती जाणून घेतली असता, अंगणवाडी शिक्षिका व तिच्या पतीचे आपसात पटत नव्हते. एकमेकांना बदनाम करण्याच्या उद्देशाने आहारात फिनाईल घातले असावे अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे शिक्षिकेच्या घरात फिनाईलचा डबा आढळून आला. यासंदर्भात चिचगड पोलीस तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
कर्जमाफी मिळविणा:या अपात्र लाभाथ्र्याकडून 627 कोटींची वसुली
By admin | Published: July 12, 2014 1:22 AM