इस्लामपूर - मागच्या काही काळात अनेक लोकांनी राष्ट्रवादीला रामराम केला, पण अलीकडे हे लोकं फोन करायला लागले आहेत. झाले गेले विसरुन आपण पुन्हा एकदिलाने काम करु, यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण शिकविले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात बेरजेच्या राजकारणाचं महत्त्व यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले आहे असं विधान कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ताकदीने उभी करण्याची गरज आहे. २०२४ ला राष्ट्रवादीला राज्यात नंबर वन पक्ष म्हणून उभारायाचं आहे. त्यामुळे शरद पवार जे सांगतील ते धोरण आपल्याला पुढे न्यायचे आहे. शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी हातात हात घालून पुढे राहिली तर आगामी काळ आपलाच असेल. शिवसेनासोबत आली आहे त्यामुळे हे सरकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल हा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात निवडणुकानंतरचं जे राजकारण झालं असेल ते पहिल्यांदाच घडलं असेल, सकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं तर रात्री भलतंच काय होत असे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुतांश लोकांची मागणी होती. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घेतली. या पक्षांना एकत्र आणून राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा एक होती पण शिवसेनेसोबत सरकार बनवावं का याबाबत शरद पवारांनी राज्यभरातील लोकांना घेतलेला कानोसा यातून हे सगळे घडलं. लोकांच्या अपेक्षा गेल्या ५ वर्ष पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. सरळ माणूस आहे. स्पष्ट वक्ता, खरं बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जाईल. मुख्यमंत्री म्हणून बघण्याची सवय तुम्हाला काही दिवसांत होईल. दुष्काळ, चारा-छावण्या अशा अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर लाख कोटींचे कर्ज आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कर्ज काढली आहेत. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत राज्याची प्रगती थांबली नाही पाहिजे या भूमिकेतून राज्याचा गाढा हाकलला जाईल. आम्हाला थोडा वेळ द्या, प्रसारमाध्यम दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारतात. थोडा वेळ जाऊ द्या, प्रश्न आपोआप मार्गी लागतील. गेल्या ५ वर्षात सांगलीतील दुष्काळाकडे ज्या दृष्टीने पाहिलं पाहिजे होतं तसं झालं नाही. थोडा वेळ या सरकारला द्यावा, सगळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी माहितीही जंयत पाटील यांनी दिली.