ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेल्या प्रवाशांना आजही सकाळीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण घाटकोपर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील बंद असून येथील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर वळण्यात आली आहे.
शुक्रवारी (12 मे)रात्रीप्रमाणेच विद्युत पुरवठ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत मध्य रेल्वेवर खोळंबा झाल्यानं प्रवासी प्रचंड संतापले आहेत.
ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा घटना कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (12 मे) संध्याकाळीदेखील हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती.
मानखूर्द-चेंबूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. पाठोपाठ मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. हार्बर मार्गावर गाडया 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रवाशांच्या कामावरुन घरी परतण्याच्यावेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मानखूर्द-चेंबूर दरम्यान बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या होत्या.
कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हहेड वायर तुटणे तर, कधी सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांशवेळा हा बिघाड सकाळच्यावेळी होतो. त्यामुळे घरातून वेळेत बाहेर पडूनही प्रवाशांना वेळेत कार्यालय गाठता येत नाही.