पौड : मुळशी तालुक्याचे मुख्य बसस्थानक म्हणून ओळख असलेले पौड बसस्थानक गेली अनेक वर्षे समस्यांच्या विळख्यात असलेले दिसून येते. मध्यंतरीच्या काळात या बस स्थानकाला वाहतूक नियंत्रक म्हणून लाभलेले ढमाले यांनी बसस्थानक जागेवरील अतिक्रमण, खासगी वाहनांची अनधिकृत पार्किंग हे प्रश्न सोडवून स्थानिक नागरिकांच्या मदतीने या बसस्थानकाची डागडुजी करून सुशोभीकरण केले होते. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा मात्र अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. ढमाले यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी जिल्हा वाहतूक नियंत्रण कार्यालयाकडून नवीन वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली असली तरी ते पुण्यात राहायला असल्याने त्यांना हवा तेवढा वेळ पौड कार्यालयाला देता येत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व मासिक पासधारकांना प्रवासी पासेस मिळण्यास अडचणी येतात. याशिवाय सकाळी लवकर येणाऱ्या व संध्याकाळनंतर येणाऱ्या गाड्या वेळेत येतात की नाही अथवा एखादी गाडी काही कारणाने रद्द झालेली असेल तर चौकशीसाठी बसस्थानकात अधिकारीच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची अनेकदा गैरसोय होत असते. याशिवाय पौड बसस्थानकात असलेले काही व्यावसायिक गाळे नादुरुस्त असल्याने रात्री तर सोडाच, दिवसाढवळ्याही या दारे मोडलेल्या गाळ्यांमध्ये चुकीचे प्रकारही घडल्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतागृहांची दारे नीट नसल्याने महिलांची कुचंबणा होते. प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा नसल्याने पावसाळ्यात तर प्रवाशांचे हाल होतात. येथील व्यावसायिक गाळे गेली अनेक वर्षे पडून असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नही बुडत आहे. चांदणी चौकापासून मुळशीपर्यंतच्या अनेक गावांच्या थांब्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे.(वार्ताहर)>पुरेशी बससेवा उपलब्ध नाहीसर्व गाड्या स्वारगेट येथून सुटत असल्याने त्याचे नियंत्रण पौड वाहतूक नियंत्रकाकडे राहत नाही. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटी महामंडळाकडे पुरेशा बस उपलब्ध नसल्याने, तसेच चालक व वाहक यांची ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यावरून जाण्याची उदास मानसिकता असल्याने तालुक्याच्या आवश्यक त्या मार्गावर पुरेशी बससेवा उपलब्ध नाही, ही वस्तूस्थिती आहे.
बसस्थानके समस्यांच्या विळख्यात
By admin | Published: January 18, 2017 1:40 AM