यदु जोशी, नागपूरआघाडी सरकारने मान्यता दिलेल्या पुणे येथील एमआयटी खासगी विद्यापीठाला वगळून देवेंद्र फडणवीस सरकारने पुणे येथीलच अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ व फ्लेम विद्यापीठ या दोन शैक्षणिक संस्थांना स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. जून २०१४ मध्ये झालेल्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमआयटी, पुणे आणि अजिंक्य डी. वाय. पाटील, पुणे या दोन विद्यापीठांना स्वयंअर्थसाहाय्यित (खासगी) विद्यापीठ म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यपालांनी त्यावर अध्यादेश जारी करावा म्हणून त्यांच्याकडे निर्णयार्थ विषय पाठविण्यात आला होता. राज्यपालांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या दोन विद्यापीठांना मान्यता देण्यासंंबंधीचे विधेयक मंजूर करून तसा कायदा करावा, असे निर्देश दिले होते. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि फ्लेम विद्यापीठ, पुणे या दोघांच्या मान्यतेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. एमआयटी, पुणे या विद्यापीठाला मान्यता देण्याचा प्रस्तावदेखील आला नाही की आधीच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा नव्या मंत्रिमंडळाला विसर पडला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने अमेटी युनिव्हर्सिटी, नवी मुंबई आणि स्पायसर युनिव्हर्सिटी, पुणे या दोघांना या आधीच स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. आजच्या निर्णयाने अशा विद्यापीठांची राज्यातील एकूण संख्या चार होणार आहे. आज मान्यता देण्यात आलेल्या दोन्ही विद्यापीठांमध्ये कर्मचारी भरती आणि प्रवेशातही आरक्षण लागू राहणार आहे.
एमआयटीऐवजी फ्लेम विद्यापीठाला मान्यता
By admin | Published: December 24, 2014 1:54 AM