पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या बहुचर्चित घटनादुरुस्तीला अखेर बहुमताने मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुण्याबाहेरील प्रतिनिधींना मुख्य कार्यकारिणीत सामावून घेण्याच्या मागणीची पूर्तता होणार आहे.संस्थेचे पाचशेच्यावर आजीव सभासद असल्याचे सांगण्यात येत आहे, पण रविवारी हिंदी भवनात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेस केवळ २० सभासद उपस्थित होते. या संस्थेचे कामाकाज काही दिवसांपासून ठप्प होते. संमेलनाव्यतिरिक्त मुलांसाठी कुठलेही साहित्यविषयक उपक्रम राबविले जात नव्हते. त्यामुळे साहित्य वर्तुळात नाराजीचे वातावरण होते. घटनादुरुस्तीसाठी सदस्यांकडून सूचना एकत्रित करून घटनादुरुस्ती समितीकडे देण्यात आल्या. समितीचे अध्यक्ष व्ही. व्ही. घाणेकर, निमंत्रक माधव राजगुरू तसेच राजेंद्र कुलकर्णी, मिहिर थत्ते यांनी त्याला अंतिम स्वरूप दिले. ही घटना या सभेत सदस्यांना वाचून दाखविण्यात आली व सर्वानुमते ती मान्य करण्यात आली. आता ही नवीन घटना मंजुरीसाठी धर्मदाय आयुक्तांकडे पाठवणार असल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बहुचर्चित घटनादुरुस्ती मान्य
By admin | Published: April 04, 2016 2:53 AM