शेफाली परब,
मुंबई- रस्ते घोटाळ्यात दोषी ठरलेल्या एसजीएस या थर्ड पार्टी आॅडिट कंपनीला पाच वर्षांपूर्वी २०११ मध्ये निविदा न काढताच महापालिकेने काम दिले होते़ एवढेच नव्हे, तर रस्त्यांच्या कामाचे परीक्षण करणारी ही देशातील सर्वांत चांगली कंपनी असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करीत प्रशासनानेच या कंपनीशी शिफारस केली होती, अशी धक्कादायक बाब उजेडात आली आहे़दरवर्षी हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे होत असतात़ मात्र, कामाचा दर्जा चांगला ठेवण्यात येत नसल्याने पालिकेने यावर थर्ड पार्टी आॅडिटची नजर ठेवण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार, खासगी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले़ हे काम तातडीचे असल्याचा दावा करीत २०११ मध्ये पालिकेने निविदा न काढताच एसजीएस या कंपनीची नियुक्ती केली होती़याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील तत्कालीन गटनेते नियाज वणू यांनी न्यायालयात आव्हान दिले होते़ मात्र, देशातील ही सर्वांत चांगली कंपनी असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिका प्रशासनाने त्या वेळी न्यायालयापुढे सादर केले होते, अशी धक्कादायक माहिती मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या आज निदर्शनास आणली़ (प्रतिनिधी)>अशी केली धूळफेकपालिका अधिनियम ७२ (३) कलमांतर्गत एसजीएस कंपनीला निविदा न मागविताच काम देण्यात आले होते़ त्यानुसार, सुरुवातीचा काही काळ या कंपनीने रस्ते दुरुस्तीत त्रुटी दाखवून दिल्या होत्या़ मात्र, एप्रिल महिन्यात उघड झालेल्या ३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात ही कंपनीही गुंतली असल्याचे समोर आले़ या कंपनीने पालिकेला फसवल्याचे उजेडात आल्यानंतर, त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू केली़