कामशेत : लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या ६४ मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात १५ दिवसांत मंत्रालयीन सर्व विभागांसोबत बैठक बोलावून ब्ल्यू प्रिंट बनवून अॅक्शन टेकन रिपोर्ट बनविणार आहोत. आण्णा भाऊ साठे महामंडळाची पुनर्रचना करून सुरळीत व पारदर्शी कारभाराची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कान्हे येथील साईबाबा सेवाधाम संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मातंग ग्रुप डेव्हलपमेंटने (एमजीडी) आयोजित केलेल्या मातंग समाज चिंतन दोन दिवसीय शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते. समाजाच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. समाजातील प्रश्न व प्रलंबित मागण्यांबाबत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ऊहापोह केला. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट,आमदार संजय भेगडे आदी उपस्थित होते. अमित गोरखे यांनी एमजीडी या विचार मंचाच्या स्थापनेचा उद्देश व कार्यप्रणाली विशद केली. शिक्षणाच्या अंगीकारातून युवकांच्या कौशल्य विकासातून मातंग समाजाचा विकास होईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जातीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. कोणत्याही समाजाचा विकास हा त्या समाजातील बुद्धिजीवी, कृतिशील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत यांच्या चिंतनातून होत असतो, असे ते म्हणाले. शिबिरासाठी सर्व जिल्ह्यांतून विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील व समाजातील इतर घटक आवर्जून उपस्थित होते.(वार्ताहर)>मागण्या योग्य : योजनांद्वारे करणार पूर्णमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजातील एमपीएससी व यूपीएससीमार्फत नवनियुक्तअधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने समतेच्या राज्याची स्थापना केली. क्रांतिवीर लहुजी साळवे हे संपूर्ण भारत देशाचे भूषण आहेत. शिक्षण क्षेत्र व इतर बाबतींत पीछेहाट दूर करण्यासाठी मातंग समाजाच्या सर्व मागण्या योग्य असून शासकीय योजनांच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
साठे महामंडळाची पुनर्रचना
By admin | Published: May 30, 2016 1:50 AM