पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्र सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी होरपळला. अकोला येथे पुन्हा सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस अशा जगातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा विक्रमही मोडला गेला आहे़
औरंगाबादमध्ये ६१ वर्षापूर्वीच्या सर्वाधिक कमाल तापमानाची बरोबरी झाली आहे़ नाशिकमध्येही ६१ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला गेला़ परभणीमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
औरंगाबादमध्ये ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ तर १७ एप्रिल २०१० रोजी औरंगाबादमध्ये ४३़५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़नाशिकमध्ये उच्चांकी ४२़७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. यापूर्वी नाशिकमध्ये २४ एप्रिल १९५८ रोजी ४२़२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़ परभणी येथेही आजवरचे विक्रम मोडत ४५़२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती़ यापूर्वी २१ व २२ एप्रिल २०१६ मध्ये ४५़१ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले होते़ तो विक्रम आज मोडला गेला़
उस्मानाबाद येथे ४३़६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ शहराच्या आजवरच्या इतिहासात हे दुसºया क्रमांकाचे तापमान आहे़ यापूर्वी तेथे २२ एप्रिल २०१६ रोजी ४३़८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़याबरोबरच अनेक शहरांमधील कमाल तापमान सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़
अकोल्यात युवकाचा बळीउष्णतेच्या लाटेचा सर्वात जास्त चटका विदर्भाला बसला आहे. जगातील उच्चांकी तापमान नोंदले गेलेल्या अकोल्यात शनिवारी उष्माघाताने एका युवकाचा मृत्यू झाला. शेषराव नामदेव जवरे असे मृताचे नाव आहे. दोन महिलांनाही उष्माघाताचा फटका बसला असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत
जळगावचा चटका ४७ अंश सारखाउष्णतेच्या लाटेत खान्देशही भाजून निघाला असून खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार जळगावचा पारा ४७ अंशावर पोहचला होता. अधिकृत हवामान केंद्रावर ४५़ ६ अंश सेल्सियसची नोंद झाली.
चार दिवसानंतर नागपूरात ४७ डिग्रीचार दिवसानंतर नागपुरातील तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, ऑरेंज अलर्टचा परिणाम नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये दिसायला लागला आहे
राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ४६.७, अमरावती ४६, बुलडाणा ४३.३, ब्रम्हपुरी ४६.४, चंद्रपूर ४६.५, गोंदिया ४३, नागपूर ४५.३, वाशिम ४४.६, वर्धा ४६, यवतमाळ ४५.२. पुणे ४२.९, अहमदनगर ४५.१, जळगाव ४५, कोल्हापूर ३९.९, मालेगाव ४४.६, सातारा ४१.५, सोलापूर ४३.१, मुंबई ३४, रत्नागिरी ३२.६,उस्मानाबाद ४३.६, औरंगाबाद ४३.६, बीड ४४.२.