नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि नवव्या टप्प्यात तीन राज्यांमधील ४१ जागांसाठी सोमवारी आधीच्या टप्प्यांप्रमाणेच भरघोस मतदान झाले. त्यामुळे सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची सरासरी स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४च्या निवडणुकीतील विक्रमी टक्केवारीपेक्षा (६४.०१) सरस ठरली. यंदा संपूर्ण देशात सरासरी ६६.३८ टक्के मतदारांनी आपला कौल दिला. सोमवारच्या टप्प्यात प. बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के, उत्तर प्रदेशात ५६ तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान झाले. प. बंगालमधील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशात वाराणशीतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तेथे ५५.३४ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये तेथे ४३.३४ टक्के मतदान झाले होते. बिहारमधील सहा, प. बंगालमधील १७ तर उत्तर प्रदेशातील १८ जागांवर अखेरच्या टप्प्यात किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान झाल्याचे उप निवडणूक आयुक्त विनोद जुत्शी यांनी सांगितले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी ५८़ १९ टक्के मतदान झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
विक्रमी मतदान
By admin | Published: May 13, 2014 3:04 AM