नवी दिल्ली : सहारा उद्योग समुहाने गुंतवणूकदारांना अजूनही परत न केलेल्या एकूण १४ हजार कोटी रुपयांपैकी पाच हजार कोटी रुपये येत्या १७ एप्रिलपर्यंत न भरल्यास या कंपनीच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारण्याचा आदेश दिला जाईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.गुंतवणूकदारांच्या पैशांची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने ४० हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या सहाराच्या अॅम्बी व्हॅलीवर टांच आणण्याचा आदेश गेल्या महिन्यात दिला होता. कंपनीकडून पैसे उभे केले जाण्याची काही चिन्हे दिसत नाहीत, असे ‘सेबी’ने निदर्शनास आणल्यावर न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांचे खंडपीठ म्हणाले की, कंपनीने १७ एप्रिलपर्यंत पाच हजार कोटी रुपयांची व्यवस्था न केल्यास अॅम्बी व्हॅली विकून पैसे वसूल करण्याचा आदेश द्यावा लागेल. सहारा रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग या सहारा समुहातील दोन कंपन्यांनी बेकायदा योजना राबवून तीन कोटी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांना परत करण्यासाठी सहारा समुहाने २५ हजार कोटी रुपये ‘सेबी’कडे जमा करावेत, असा आदेश न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये दिला होता. तेव्हापासून सहाराने फक्त ११ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यापैकी सहा हजार कोटी रुपये न्यायालयाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय व दोन संचालकांना ४ मार्च २०१४ रोजी तुरुंगात पाठविल्यानंतर भरले गेले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘अॅम्बी व्हॅली विकून पैशांची वसुली करू’
By admin | Published: March 22, 2017 2:25 AM