मुंबई : राज्य सरकारने साठेबाज व्यापाऱ्यांवर छापे टाकून जप्त केलेल्या डाळ व तेलापैकी ७० टक्के माल त्यांना परत केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. त्यामुळे धाडसत्र हा केवळ दिखावा असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या साहित्यापैकी ८५ हजार ५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यामागील कारण काय, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.दिवाळीदरम्यान तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यांत ५ हजार ५९२ ठिकाणी छापे टाकले. त्यातून ५३९.५० कोटींचा डाळ आणि तेलसाठा जप्त केला होता. गलगली यांनी शासनाकडे साठेबाजाकडून जप्त साठा, किंमत, परत केलेला माल, शिल्लक माल आणि गुन्ह्यांची माहिती मागितली होती. शासनाने ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांंनी प्रथम अपील दाखल केले. अपीलानंतर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे उप सचिव एस. एस. सुपे यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ७ प्रादेशिक विभागात ५ हजार ५९२ ठिकाणी धाडी घालून गोदामे तपासण्यात आली होती. त्यातून डाळ, तेल आणि तेल बियाणे असा १,२३,०२८.३८९ मेट्रीक टन माल जप्त करण्यात आला. त्यापैकी ८५,५४७.७८१ मेट्रीक टन माल परत करण्यात आला असून ३७,४८०.६०८ मेट्रीक टन शासनाच्या ताब्यात आहे.
जप्त केलेला माल साठेबाजांना परत
By admin | Published: January 22, 2016 3:43 AM