नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे भाजी मार्केट अवैध व्यावसायाचा अड्डा बनत चालले आहे. प्रत्येक विंगमध्ये खाद्यपदार्थांपासून पान, बिडीव्रिकीचे बेकायदेशीर स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रत्येकाकडून महिन्याला किमान ५ हजार रुपये भाडे एक हॉटेलचालक वसूल करत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या वसुलीकडे बाजारसमिती प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेच या व्यवसायाला अभय असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. राज्य शासनाने भाजी, फळे, डाळी, सुकामेवा, साखरेसह महत्त्वाच्या वस्तू नियमनमुक्त केल्या आहेत. यामुळे राज्यातील इतर संस्थांप्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उत्पन्न झपाट्याने कमी होऊ लागले आहे. बाजारसमिती बंद होण्याची शक्यता वाटू लागल्याने अनेकांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचे धान्य कोठार अशी ओळख असलेली संस्था बंद पडू नये, यासाठी बाजारसमितीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणीकपणे मेहनत करण्याची आवश्यकता आहे; परंतु संस्था टिकविण्याऐवजी अवैध मार्गाने स्वत:ला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, यासाठीची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे संस्थेचे उत्पन्न बुडवून वैयक्तिक उत्पन्न सुरू करण्याची प्रथा पडली असून त्यामधून अवैध व्यवसायाला हातभार लावला जात आहे.यामध्ये भाजी मार्केट आघाडीवर आहे. मार्केटच्या प्रत्येक विंगमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसविण्यात आले आहेत. कामगारांना व ग्राहकांसह इतर घटकांना ये-जा करण्यासाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेमध्ये इडली डोसा, वडापाव, पान, बिडी, सिगारेट, रगडा पॅटीस, शेव पुरी, ओली-सुखी भेल, चना भेल व इतर वस्तू विकणाऱ्यांना जागा भाड्याने देण्यात आली आहे. भाजी मार्केटच्या विंगमधील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, येथे खाद्यपदार्थ विकणारे सर्वच्या सर्व परप्रांतीय आहेत. यामधील काही विक्रेत्यांशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यवसाय करण्यासाठी एका हॉटेलवाल्याला महिन्याला ५ हजार रुपये भाडे द्यावे लागते. ज्या ठिकाणी जास्त व्यवसाय होतो, तेथे हा दर जास्त आहे. बाजारसमितीच्या जागेवर मार्केटमधीलच एक हॉटेलचालक खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांना स्वत: जागा भाडेतत्त्वावर कशी देऊ शकतो, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असून त्याकडे बाजारसमितीचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे दुर्र्लक्ष करत आहेत. प्रशासनाचेच अभय असल्यामुळे सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. येथे व्यवसाय करणाऱ्यांची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. भविष्यात या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा झाली किंवा दुसरा गंभीर गुन्हा घडला तर जबाबदार कोण? असा प्रश्न मार्केटमधील घटक उपस्थित करू लागले आहेत. >जागा एपीएमसीची, कमाई हॉटेलवाल्यांची मार्केटमधील सार्वजनिक वापराच्या जागेची मालकी एपीएमसी प्रशासनाची आहे. या जागेवर बिनधास्तपणे हॉटेलचालकांनी व इतरांनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा भाडेतत्त्वावर दिली असून, त्या माध्यमातून हजारो रुपयांची कमाई केली जात आहे. या प्रकाराकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वास्तविक या प्रकाराची सखोल चौकशी करून अभय देणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची गरज आहे. >कोणाकडेच नोंदणी नाहीसर्व खाद्यपदार्थ विक्रेते परप्रांतीय आहेत. त्यांना येथे व्यवसाय करण्यासाठी कोणी परवानगी दिली, त्याची कोणाकडेच लेखी नोंद नाही. विक्रेत्यांचे नाव, मूळ गाव, येथील वास्तव्याचा पुरावा, त्यांची पार्श्वभूमी याविषयी काहीही माहिती एपीएमसी प्रशासन, सुरक्षा विभाग व इतर कोणाकडेच नाही. ज्या हॉटेलवाल्याचे नाव सांगितले जाते, त्यांचेही ओळखपत्र नाही. >विषबाधा होण्याची शक्यता भाजी मार्केटमधील प्रत्येक विंगमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सवरील कर्मचाऱ्यांचे हात अस्वच्छ असतात. परिसरही अस्वच्छ असतो. खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे असल्याबद्दल काहीही खात्री नाही. या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना झाल्यास त्यांचे गंभीर परिणाम बाजारसमितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोगावे लागणार आहेत.
फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली
By admin | Published: May 14, 2017 1:55 AM