मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येते. याची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ८९० डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून याद्वारे अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात ८९० पदे भरण्यास सुरुवात झाली असून अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांची पदे भरण्यात आल्याची माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. राज्यातील आरोग्य केंद्र आणि तेथील डॉक्टरांची संख्या आधीच व्यस्त होती. त्यामुळे सर्वांनाच रुग्णसेवेचा लाभ मिळत नव्हता. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची अधिक चणचण जाणवत होती. त्यातून आरोग्य विभागाने डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात रस्त्याची सोयही नाही अशा भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
राज्यात सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा ‘गट अ’मधील विशेषज्ञांची एकूण १ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५४ पदे भरलेली आहेत. तर, ६४३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा ‘गट अ’मधील वैद्यकीय अधिकारी आणि ‘आयपीएचएस’अंतर्गत शल्यचिकित्सक, प्रसूती तज्ज्ञ, फिजिशियन आणि बालरोग तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येणार आहेत. भरती करण्यात आलेले डॉक्टर अस्थायी प्रकारे सेवा करत होते. आता त्यांना कायम करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.डॉक्टरांच्या इच्छेप्रमाणे भरती करत आहोत. जेवढी रिक्त पदे आहेत ती पदे भरण्यात येतील. या अस्थायी डॉक्टरांच्या मेरिटप्रमाणे त्यांची भरती करत आहोत. भरती कायमस्वरूपी करण्यात आल्याने डॉक्टरही समाधानाने काम करतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.