मुंबई : सध्या सोशल मीडियावर, मुख्यत्वे फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर जवळपास 3000 पेक्षा जास्त पदांची भरती जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीतील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, ही जाहिरात खोटी असून आर्थिक घोटाळ्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंवाद या न्यूज पोर्टलवर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटी.
या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न. खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू. या खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन ग्रामविकास विभागाचे केले आहे. त्यामुळे, बेरोजगार आणि नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शहानिशा केल्याशिवाय कुठेही अर्ज भरू नये, यातून आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.