मुंबई : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ठेकेदारी पद्धतीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो भारतीय सैन्याचा अपमान आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
अग्निपथ योजनेवरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. याआधी 2 कोटी 10 कोटी अशा घोषणा केल्या होत्या. आता नवीन अग्निपथ. सैन्याला एक शिस्त असते. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीने भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना ठेकेदारी पद्धतीने कसे काय घेतले जाऊ शकते, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
ठेकेदारी पद्धतीने सैन्य भरती हा संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान आहे. फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणे हा संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे. गुलामांना ठेकेदारीवर ठेवतात. देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याला ठेकेदारीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, देशात सध्या काय चाललं आहे किंवा काय होणार आहे? हे कोणालाच माहित नाही. या योजनेवरुन संपूर्ण देशात वणवा पेटला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, "सर्वच पक्षाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजनाथसिंह यांनीही मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. भाजप देशातील सर्व पक्षांना राष्ट्रपती निवडणुकसाठी फोन करत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची एक प्रकिया असते. सर्वसमंतीने उमेदवार निश्चित झाला तर चांगलंच आहे."