पुणे : शासनाच्या विविध पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी बैठकीत दिले.राज्यातील सर्व विभागातील लिपिक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते. परंतु, प्रत्येक विभागातील लिपिक संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी वेगळी जाहिरात प्रसिद्ध करणे, वेगळी परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, यात बराच कालावधी जातो. तसेच या परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे सर्व विभागांच्या लिपिक संवर्गातील पदांची राज्य स्तरावर एकच परीक्षा घ्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. त्यानुसार स्वतंत्रपणे परीक्षा न घेता राज्य स्तरावर एकच परीक्षा घ्यावी, अशी सूचना भरणे यांनी दिली.महापरीक्षा पोर्टल सुरू असताना प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार सुमारे ३२ लाख उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांसाठी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. परंतु, दोन वर्ष उलटूनही परीक्षा झाली नाही. वयाची अट ओलांडल्यामुळे परीक्षेपासून अपात्र होण्याची भीती आहे. मात्र, याबाबत शासन सकारात्मक निर्णय घईल, असेही आश्वासन भरणे यांनी दिले.
शासनाच्या विविध पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:47 AM