मुंबई : उत्तर अमेरिकेतील आर्टिक व युरेशिया भागात आढळणारा रेड फालोरोप हा पक्षी शुक्र वारी १८ मार्च रोजी भिगवणजवळच्या उजनी जलाशयात दिसला. हा पक्षी स्थलांतर करताना रस्ता चुकला असावा किंवा तो त्यांच्या थव्यातून चुकून बाहेर पडून इथे आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी नागपूर व राजस्थानमध्ये या पक्षाचे दर्शन घडले होते. भिगवणमध्ये तो पहिल्यांदाच आढळला ही पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. विपुल प्रमाणात खाद्य असलेल्या ठिकाणी हा पक्षी जातो. त्यामुळे जलाशये आणि पर्यावरण यांची नीट काळजी घेतल्यास या परिसरात असे दुर्मिळ पक्षी मोठ्या प्रमाणात येतील, असे पक्षीनिरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यासाठी भिगवणसारख्या दलदलीच्या ठिकाणांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे आदेश शिवरकर यांनी सांगितले.यापूर्वी हा पक्षी पुण्याचे वन्यजीव छायाचित्रकार आणि पक्षीतज्ज्ञ राहुल सचदेव व छायाचित्रकार संगमेश्वर धत्तर्गी, जनकराजन सरवानन यांच्या नजरेस पडला होता. त्यावेळी त्यांना तो रेड नेक्ड फालोरोप वाटला, मात्र त्याची छायाचित्रे पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध पक्षी निरीक्षक व पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी तो रेड फालोरोप असल्याचे स्पष्ट केले.
पुण्याजवळ आढळला उत्तर अमेरिकेतला रेड फालोरोप
By admin | Published: March 22, 2016 4:16 AM