मुंबई : मोडकळीस आलेल्या इमारती, झोपड्यांचा प्रश्न या परिसरात गंभीर आहे. तसेच सरकारी वसाहतींबरोबरच म्हाडांतर्गत असलेल्या घरांचा पुनर्विकास, तसेच सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलची प्रतीक्षा सध्या मुंबई उपनगरमधील एच ईस्ट वॉर्डला आहे. एच ईस्ट वॉर्डात इमारत पुनर्विकास आणि रुग्णालय हे प्रश्न गेली अनेक वर्षे सुटलेले नाहीत. त्यामुळे एच ईस्ट वॉर्डचा पुनर्विकास होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होतो, तसेच पाणी, अस्वच्छता इत्यादी समस्याही या परिसरात आहेत. एच ईस्ट वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ८७ पासून प्रभाग क्रमांक ९६ येतो. या प्रभागांमध्ये पुढील परिसर येतात. या वॉर्डत निर्मलनगर, गांधीनगर, खेरनगर येथे म्हाडाच्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. मुंबईतील ५६ हाउसिंग सोसायट्यांपैकी ही सोसायटी सर्वात मोठी असल्याचे सांगितले जाते. शासनाने याबाबत नुकताच एक निर्णय घेतला असून, त्यामुळे मुंबईतील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जाते. तरीही पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी करून तो प्रचाराचा मुद्दा बनवला जाऊ शकतो. दुसरीकडे वांद्रे पूर्व येथे मोठी सरकारी वसाहत आहे. ही घरे नावावर करावीत किंवा त्यांचा पुनर्विकास करावा, यासाठी ४० वर्षे सेवेत असलेले आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र, यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरांच्या पुनर्विकासाची मागणी ठेवण्यात आली आहे. त्यावरही तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. एच ईस्ट वॉर्ड परिसरात म्हणावे तसे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे, वांद्रे पूर्व परिसरात ‘मातोश्री’ही असून येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. सर्वसामान्यांना या परिसरात रुग्णालयाची गरज भासते. सरकारी वसाहतीत सरकारी रुग्णालय आहे. मात्र, त्यात अनेक गैरसोयी आहेत. ओपीडी असल्याने, भारतनगर, निर्मलनगर, खेरवाडी, बेहरामपाडा येथूनही अनेक जण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयावर मोठा ताण पडतो. एमआयजी परिसरात एक खाजगी रुग्णालय आहे, परंतु सर्वसामान्यांना ते परवडणारे नसल्याने, अनेक जण वांद्रे पश्चिम येथे असणाऱ्या भाभा रुग्णालयाकडे धाव घेतात. त्यामुळे सरकारी वसाहत किंवा जवळपास सुरपस्पेशलिटी हॉस्पिटलची मागणी केली जात आहे. (प्र्रतनिधी)>वॉर्डतील काही महत्त्वाचे भागहनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस. ३, सेननगर, व्ही.एन. देसाई रुग्णालय, आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतीक्षानगर, शिवाजीनगर, लाल बहादूर शास्त्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट, कलिना, पी अँड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टेट वसाहत, विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंतनगर, पोलीस प्रशिक्षण मैदान, एमएमआरडीए ग्राउंड, बीकेसी, ज्ञानेश्वरनगर, भारतनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर, गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहरनगर, खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मलनगर, वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरीबनगर, वांद्रे कोर्ट या परिसराचा समावेश आहे. >झोपडपट्ट्यांची संख्या लक्षणीय : हनुमान टेकडी, गोळीबार, वाकोला, डवरीनगर, प्रतीक्षानगर, ज्ञानेश्वरनगर, भारतनगर, बेहराम पाडा, गरीबनगर हा परिसर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांनी वेढलेला आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणी असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकासही झालेला नाही. गोळीबार येथे तर एक एसआरए प्रकल्प २००६पासून रखडलेला आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन वेळोवेळी लढा दिला, परंतु अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. या सर्व परिसरात पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे.
पुनर्विकास, रुग्णालयाची प्रतीक्षा
By admin | Published: January 16, 2017 2:23 AM