बारामती : एकीकडे दुष्काळाच्या दाहकतेने बारामती-इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय असणारा दूधधंदा कमी दरामुळे बसला आहे. येथील लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे जिल्हा दूध संघापासून बारामती आणि इंदापूर तालुका दूध संघ वेगळे राहिले. जिल्हा दूध संघाला दूध घालणाऱ्या इतर तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सरासरी २२ रुपये प्रतिलिटर दर बसत आहे. तर बारामती इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांना केवळ १८ ते १९ रुपये दर मिळत असल्याने लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी तोटा या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी २० रुपयांच्या खाली कमी दर देणाऱ्या संस्थांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. इंदापूर तालुका दूध संघाची अवस्थाही तितकीशी चांगली नाही. या संघाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आंदोलने केली होती. बारामती आणि इंदापूर तालुक्यात खासगी दूध व्यावसायिकांनी आपले प्राबल्य वाढवले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. दुष्काळाच्या दाहतेने दुधाच्या उत्पादनखर्चात कमालीची वाढ झाली आहे. बारामतीच्या जिरायती भागात कडबा ३ हजार ५०० रुपये शेकड्याने विकला जात आहे. तसेच सध्या जनावरांसाठीही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने जनावरांमधील विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जनावरांवरील वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांना लागणारे पशुखाद्याचे दरही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ५० किलो पशुखाद्यासाठी ९५० ते १००० रुपये शेतकऱ्याला मोजावे लागत आहेत. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दूध पावडरचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे दुधाचे दर कमी झाले आहेत. पिशवीबंद दुधावर दर अवलंबून नसतो. भाजप सरकारने दूधपावडर निर्यातीला असणारे सहा टक्के अनुदान बंद केले. त्यामुळे दोन वर्षांपासून निर्यात बंद आहे. त्यामुळे लाखो टन पावडरचे साठे पडून आहेत. साहजिकच निर्यातीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे; अन्यथा दूध धंदा संपुष्टात येईल. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध. दुष्काळात जगण्याचा एकमेव आधार असलेला दूधधंदाच आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे. दुधाला योग्य दर मिळावा, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी ‘अमूल’ची मागणी केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही हालचाल झाली नाही. सध्या इंदापूर तालुक्यात खासगी दूध संस्था ३.५ फॅट आणि २९ डिग्री दुधाला प्रतिलिटर १८ रुपये दर देत आहेत. तर सरासरी हाच दर १७.५० मिळत आहे. गाईला दिवसभरात १० ते १२ किलो हिरवा चारा लागतो. दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे.
कमी दरामुळे दूधधंदाही बसला!
By admin | Published: March 10, 2016 1:02 AM