इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील दर कमी करण्यावर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं ते म्हणाले.
“१५ रुपये वाढवायचे ९ रुपये कमी करायचे, आपली तिजोरी भरायची असा हा भाग आहे. याविषयी मुख्यमंत्री, राज्य सरकार, अर्थमंत्री निर्णय घेतील. इंधनाच्या किंमती करणं केंद्र सरकारची जबाबदारीच आहे. हा राज्याच्या अखत्यारितील विषय नाही. कच्च्या तेलाच्या किंमती, आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे हे तुम्हालाच पाहायचं आहे,” असं राऊत म्हणाले. केंद्र सरकारनं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा द्यावा. आम्हालाही काही गोष्टी करण्यासाठीही ताकद मिळेल. यावर कोणीच काही बोलत नाही. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही काही बोलत नाहीत. त्यांनीही जीएसटीच्या परताव्यासाठी तगादा लावला पाहिजे, असंही ते म्हणाले. राज्य सरकारची जी जबाबदारी आहे ते राज्य सरकार पूर्ण करेलच, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं."एकेकाळी आम्ही वाजपेयी, अडवाणींचंही ऐकायचो"“बाळासाहेबांचंच शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचंही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेही नव्हते. अटलजींचे आदेश सूचना आम्ही पाळल्या. शरद पवार यांचं मार्गदर्शन पंतप्रधानही घेतात हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजकारणाची माहिती कमी आहे,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.