शरद गुप्ता -नवी दिल्ली : शिवसेनेतील सध्याच्या घटनाक्रमात लोक जनशक्ती पार्टीत झालेल्या विभाजनाचे प्रतिबिंब दिसत आहे. रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांच्या पक्षाची जी स्थिती झाली तसे शिवसेनेचे भविष्य दिसत आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य शिंदे यांच्याकडे आहेत. तर, संघटना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आपला गटच खरी शिवसेना असल्याचे शिंदे सांगतात. तर उद्धव ठाकरे गट आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगतात. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदे व काही आमदार नॉट रिचेबल झाले. सुरतमार्गे २५ ते ३० आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री त्यांना जाउन मिळाले. या संघर्षाचा एक टप्पा न्यायालयात सुरू झाला आहे. अशाच प्रकारचे चित्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात दिसून आले होते.
लोजपामध्ये काय घडले ?लोक जनशक्ती पार्टीचे नेतृत्व त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आले. मात्र, गत ८ ऑक्टोबर रोजी त्यांचे काका पशुपतीनाथ पारस हे पक्षातील ६ पैकी ५ खासदारांना घेऊन वेगळे झाले. चिराग पासवान यांना त्यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून काढून टाकले आणि आपलाच खरा लोजपा आहे, हे सांगितले.
लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ त्यांना संसदीय पक्षाची मान्यता दिली. पारस यांना केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे निवडणूक चिन्ह बंगला जप्त केले आणि चिराग पासवान यांच्या लोजपा रामविलास पासवान यांना हेलिकॉप्टर चिन्ह दिले. तर पारस यांच्या पक्षाला राष्ट्रीय लोक जनशक्तीचे नाव देऊन शिलाई मशीन चिन्ह मिळाले.
पुढे काय?सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यानंतरची लढाई विधानसभेत होणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबत आणखी एक लढाई होईल. जर लोजपा एक उदाहरण म्हणून पाहिले तर तसाच घटनाक्रम घडल्यास नुकसान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच होईल, अशी चर्चा सुरू आहे.