नामदेव मोरे,नवी मुंबई- रायगड हा शिवप्रेमींसाठी प्रेरणास्रोत. प्रतिदिन शेकडो इतिहासप्रेमी गडाला भेट देत आहेत. रोपवे असला तरी पायरी मार्गाने गडावर जाण्यास अनेक जण प्राधान्य देतात. दोन तास पायपीट करून गडावर गेल्यानंतर मात्र अनेकांचा भ्रमनिरास होतो. गडाची निर्मिती ते आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती देणारे साधे फलकही गडावर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे अवशेष पाहून व गाइड सांगेल तेवढीच माहिती घेऊन परत फिरावे लागत आहे.राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये याविषयी अधिकृत घोषणा केली जाणार आहे; पण भाजपा सरकारने दोन वर्षांपूर्वी पाचाडमध्ये १०० एकर जमिनीवर जिजाऊसृष्टी उभारण्याची घोषणा केली होती, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे गडावर फक्त घोषणाबाजी होणार की प्रत्यक्ष आराखडा सादर करून विकासाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, याकडे देश-विदेशातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. रायगड हा शिवप्रेमींचे प्रेरणास्रोत आहे. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रोज शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. गडावर जाण्यासाठी रोप वेची सोय असली तरी तरुणांसह वृद्ध इतिहासप्रेमी पायरी मार्गाचा अवलंब करूनच गडावर जाण्यास प्राधान्य देत आहेत. दोन तास पायपीट केल्यावर किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो; पण तो फार काळ टिकत नाही. येथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. गडावर जाणाऱ्या नवख्या पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. रायगडची निर्मिती कशी झाली. येथे कोणत्या लढाया झाल्या. हिरोजी इंदलकरांनी गडाचे बांधकाम परिपूर्ण होण्यासाठी नक्की कोणते तंत्र वापरले. वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून त्याची रचना नक्की कशी झाली. गडावर झालेली युद्धे, विविध घटना, घडामोडी यांच्या सनावळीसह सर्व तपशिलाचे माहितीफलक उपलब्ध होतील, अशी अपेक्षा असते; पण प्रत्यक्ष गडावर गेल्यानंतर फक्त छोटीशी पाटी लावलेली पाहावयास मिळते. या पाट्यांव्यतिरिक्त काहीही माहिती उपलब्ध होत नसल्याने पर्यटक निराश होत आहेत. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये सद्यस्थितीमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे; पण गडावर आताही भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तलाव व विहिरींची सोय करण्यात आली आहे. हे नियोजन कसे करण्यात आले. खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघदरवाजा टकमक टोक, हिरकणी बुरूज या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती देणारे फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. रायगडावर ५० पुस्तके : इतिहास संशोधकांचे विपुल लेखनरायगड किल्ला हा इतिहास संशोधक व शिवप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. आतापर्यंत गडावरील ऐतिहासिक घटना, येथील वास्तू व इतर सर्व घडामोडींची माहिती देणारी ५० पुस्तके लिहिण्यात आली आहेत. यामध्ये पांडुरंग पाटणकर, उदय दांडेकर, शंकर अभ्यंकर, आप्पा परब, प्र. गो. भाट्ये, म. श्री. दीक्षित, शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे, प्र. के. घाणेकर, गजानन आर्ते, प्रवीण वसंतराव भोसले, बळवंत मोरेश्वर पुरंदरे, प्रभाकर भावे, वि. वा. जोशी, प. रा. दाते, गोपाळ चांदोरकर, अंताजी जोशी, गोविंदराव जोशी, सचिन जोशी, प्र. न. देशपांडे, गे. ना. परदेशी, सोमनाथ समेळ, केशव हर्डीकर, सुधाकर लाड, शांताराम आवळसकर, गोविंद टिपणीस, रमेश साठे, गो.नी. दांडेकर, मधू रावकर व इतर इतिहास संशोधकांनी विपुल लेखन केले आहे. यामधील माहितीचे फलक करून लावले तरी पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकेल, असे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे. गडावर जाणाऱ्या नवख्या पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. रायगडची निर्मिती कशी झाली. येथे कोणत्या लढाया झाल्या, विविध घटना यांच्या सनावळीसह सर्व तपशिलाचे माहितीफलक उपलब्ध होतील, अशी अपेक्षा असते; मात्र प्रत्यक्ष गडावर गेल्यानंतर छोटीशी पाटी लावलेली पाहावयास मिळते. या व्यतिरिक्त माहिती उपलब्ध होत नाही.दोन तास पायपीट केल्यावर रायगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो; पण तो फार काळ टिकत नाही. येथे झालेली दुरवस्था पाहून पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.रायगडची १५ नावेरायगडला विविध नावाने संबोधले जाते. युरोपीयन त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत. हा किल्ला जिंकण्यास अवघड असल्याने त्यांनी असे नामकरण केले होते. गडाचे प्रत्यक्ष बांधकाम करण्यापूर्वी त्याला रासिवटा व तणस अशी दोन नावे होते. याशिवाय रायरी, नंदादीप, जंबुद्वीप, बदेनूर, रायगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर अशा विविध नावाने ओळखले जाते. ही नावे व त्याविषयी माहितीही गडावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. >शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आम्ही पायरी मार्गाने गडावर गेलो. गडाविषयी पुस्तकातून व संकेतस्थळावर खूप वाचले होते. यामुळे गडावर गेल्यावर इतिहास समोर उभा राहील असे वाटले होते. पण प्रत्यक्षात गडावर एकाही ठिकाणी पुरेशी माहिती मिळेल असे फलक दिसले नाहीत. नवीन येणाऱ्या पर्यटकांना भग्न अवशेषांव्यतिरिक्त काहीही पाहावयास मिळत नाही. - संजय मर्ढेकर, दिघा, नवी मुंबई पायरी मार्गाने गेल्याशिवाय गडाचे महत्त्व कळत नाही. आम्ही नियमितपणे पायीच जात असतो. प्रत्येक वेळी गेल्यानंतर गडावर माहिती फलक पुरेसे नसल्यामुळे निराशा होते. अनेक नवीन पर्यटकांना माहितीच मिळत नाही. गाइड सांगतील तेवढीच माहिती ऐकून परत यावे लागते. सरकारने लवकरात लवकर शिवसृष्टी साकारावी. - गणेश माने, शिवप्रेमी
रायगडावर पर्यटकांचा भ्रमनिरास
By admin | Published: April 05, 2017 3:14 AM