मुंबई : एसटी आगार किंवा स्थानकांच्या २00 मीटर परिसरात अवैध वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु या आदेशाचा एसटीसह आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. भिवंडीच्या घटनेनंतर उशिराने जाग आल्यानंतर रिक्षांवर कारवाई करतानाच आगारांना लागून असलेल्या अवैध बांधकामांवरही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात दिवाकर रावते यांना विचारले असता, २00 मीटर परिसरात अवैध वाहनांना बंदी आहे. परंतु रिक्षा या काही अवैध वाहतूक नाहीत. एसटीतून उतरणाऱ्या प्रवाशांना अन्यत्र जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील काही भागांत एसटीच्या स्थानक व आगारांबाहेर रिक्षा स्टॅण्ड आमच्याकडून उभारण्यात आले आहेत. मात्र रिक्षाचालकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे आणि एसटीला त्यांचे काम करून देण्यात यावे एवढाच मुद्दा आहे. अवैध वाहनांविरोधात कठोर कारवाई ही सुरूच राहील. (प्रतिनिधी)
एसटीला नियमांचा विसर
By admin | Published: February 11, 2017 5:06 AM