विशेष प्रतिनिधी /लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या कार्याचा गौरव योग्य औचित्य साधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना सांगितले.दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अंत्योदयाचे प्रणेते पं. दीनदयाळ उपाध्याय, ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख, पद्मविभूषण शरद पवार, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई आणि ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ५ आॅगस्टला मांडण्यात येणार आहे. मात्र, त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विसर सरकारला पडला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. या बाबत मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ज्या नेत्यांचा गौरव केला जाणार आहे त्यांच्याबाबत काही ना काही औचित्य (जन्मशताब्दी वा सांसदीय कारकीर्द) आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी आम्हाला आदरच आहे. त्यांच्या स्मारकासंबंधीच्या विधेयकास विधिमंडळाने एकमताने मंजुरी दिली होती. शिवसेनेच्या नेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आज या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनाप्रमुखांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा, अशी मागणी केली. ‘या बाबत कोणाचेही दुमत नाही. योग्य औचित्य साधून हा गौरव नक्कीच केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गोऱ्हे यांना दिले.
बाळासाहेबांचा यथोचित सन्मान करू - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:48 AM