नवी दिल्ली : पुणे, धारवाड, इंदूर, त्रिची आणि अन्य काही शहरांतील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक बातमीपत्र बंद न करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. ही प्रादेशिक बातमीपत्रे सुरूच ठेवण्याचे निर्देश प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश यांनी दिल्याचे समजते.आकाशवाणीचे महासंचालक (वृत्त) सीतांशू यांनी जारी केल्या पत्रकानुसार पुणे, इंदूर, भूज, धारवाड, दिब्रूगड, त्रिची आणि कोझीकोड येथील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक वृत्त विभागाच्या बातमीपत्र, मुख्य बातम्या आणि कार्यक्रम यासारख्या सेवा नेहमीप्रमाणे चालू राहतील. अलाहाबाद, पौडी, जालंधर, पटियाला, कोइम्बतूर आणि कोची येथील बातमीदार पुढील आदेशापर्यंत या भागात आपले काम करीत राहतील. माहिती आणि नभोवाणी मंत्रालय काही शहरांतील आकाशवाणी केंद्रातील अनेक दशकांपासूनची वृत्तसेवा बंद करणार, असे वृत्त आल्याने आकाशवणीचे श्रोते नाराज झाले होते.सूर्यप्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही सेवा सुरूच राहणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. यासाठी मी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंतीही करीन, असेही ते म्हणाले.मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार आकाशवाणी केंद्रांतून प्रादेशिक बातम्या देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. (वृत्तसंस्था)
पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच
By admin | Published: August 12, 2016 4:41 AM