मुंबई : प्रदूषण करणाऱ्या बीएस-३ इंजिनाच्या वाहनांची विक्री ३१ मार्चनंतर करण्यास बंदी घालण्यात आली आणि तीच संधी साधत ३0 व ३१ मार्च रोजी वाहन कंपन्यांनी सवलत देऊन, या मानकातील वाहनांची विक्री केली. त्यामुळे वाहन नोंदणीत मोठी वाढ झाली. बीएस-३ सह अनेक नवीन वाहनांच्या नोंदणीमुळे या दोन दिवसांत एकूण वाहन नोंदणी ४४ हजार ४२८ एवढी झाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानकात वेळोवेळी सुधारणा होत असते. त्यानुसार, बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यामुळे ३0 व ३१ मार्च रोजी वाहन कंपन्यांकडून बीएस-३ वाहनांवर २0 ते ३0 टक्के सवलत देऊन वाहनविक्री केली. त्यामुळे या मानकातील वाहने विकत घेण्यासाठी शोरूममध्ये गर्दी झाली. या वाहनांच्या विक्रीमुळे तर राज्यातील आरटीओलाही अंदाजे १00 कोटींपर्यंत महसूल मिळाल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. बीएस-३ मानकातील वाहनविक्रीमुळे राज्यातील आरटीओतील वाहन नोंदणीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले. राज्यभरात दररोज ८ ते ९ हजार वाहनांची नोंदणी होते. मात्र, बीएस-३ वाहनांमुळे ही नोंदणी तीन पटीपर्यंत वाढली. ३0 मार्च रोजी बीएस-३ मानकांसह अन्य वाहनांचीदेखील विक्री झाल्याने या दिवशी १५ हजार ५५६ वाहनांची नोंद झाली, तर ३१ मार्च रोजी हाच आकडा २८ हजार ८७२ पर्यंत पोहोचला. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईत ३0 मार्च रोजी विविध प्रकारच्या १ हजार ११८ तर ३१ मार्च रोजी १ हजार ७२७ वाहनांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)100 कोटींपर्यंत महसूल परिवहन विभागाला मिळालेला असतानाच, यात मुंबईतून ३0 मार्च रोजी ५ कोटी ४७ लाख आणि ३१ मार्च रोजी ७ कोटी ५९ लाख रुपये महसूल मिळाला आहे.
दोन दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाहन नोंदणी
By admin | Published: April 10, 2017 4:30 AM