पुणे : बनावट कंपनीद्वारे देशभरात तब्बल ८६ हजार डोमेनची विक्री करण्यात आली असून, याच डोमेनचा वापर करून पाकिस्तानातील काही जणांच्या ११६ बनावट संकेतस्थळांची नोंद झाल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या तपासामध्ये समोर आले आहे. यातील ११ डोमेन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’शी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांकडून गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्यांचा ‘अँगल’ही तपासण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी विकलेल्या डोमेनद्वारे लष्करी, शासकीय, नायजेरियन फसवणूक झाल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. सायबर गुन्हे शाखेने हरगुरुनाज करमसिंग विजयसिंग (वय २०), परभनाज करमसिंग विजयसिंग (वय २५, दोघेही रा. जालंधर, पंजाब) या भावांना अटक केली होती. लष्कर भागातील एकाचा मेल आयडी हॅक करून चीनमधील कंपनीच्या नावाने आरोपींनी लाखो रुपये मागितले होते. सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. हा ई-मेल नायजेरियामधून आल्याचे समोर आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्याचे डोमेन भारतातच असल्याचे निष्पन्न होताच पोलीस आरोपींपर्यंत पोचले. त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली. आरोपींनी स्वत:च्या मालकीची ‘आयडिया बीझ’ नावाची डोमेन कंपनी सुरू केली होती. ही कंपनी नायजेरियामध्ये असल्याचे भासवण्यात आले. पब्लिक डोमेन रजिस्टर (पीडीआर) या अधिकृत कंपनीचे रीसेलर म्हणून दोघे काम करत होते. या कंपनीमार्फत त्यांनी ८६ हजार बनावट डोमेन रजिस्टर नोंदवण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्याचा वापर करून इन्शुरन्स, जॉब, लॉटरी, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, सीड्स, आॅनलाइन बिझनेस फ्रॉड अशा फसवणुकींसाठी करण्यात आला आहे. या संकेतस्थळांचे डोमेन बनावट असल्याचे इंटरनेट युझर्सनी पीडीआरला कळवले होते. पीडीआरने अशा प्रकारचे ४० हजार डोमेन डिलिट केले आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात फसवणुकीचे सायबर सेलकडे ३९१ अर्ज आले आहेत. यापैकी २० ते २१ गुन्हे निघण्याची शक्यता सायबर सेलच्या पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पाकमधून बेकायदा संकेतस्थळांची नोंदणी
By admin | Published: February 10, 2017 3:21 AM