अमरावती, दि. 10 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात आपले सरकार या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर 'डेडलाइन' आहे. मात्र या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरुवातीपासूनच या योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही. बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाइन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.११ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाइन अर्जअमरावती विभागात १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३,८३,४५७ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली व ३,४२,५३४ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात १,८६,३९७ नोंदणी व १,५४,६४८ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,४२,४८३, शेतक-यांची नोंदणी व १,९७,२३८ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात १,९५,५०६ शेतक-यांची नोंदणी व १,६३,१३६ अर्ज भरले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३,५०,९२५ शेतक-यांची नोंदणी व २,७९,४३८ शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
13 लाख शेतक-यांची कर्जमाफीसाठी नोंदणी, बुलडाण्यात सर्वाधिक 3.42 लाख भरले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 5:18 PM