पुणे : जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीच्या दृष्टीने डिसेंबर महिना महत्वाचा मानला जातो. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र, बुधवारी सकाळपासूनच राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यभरातील व्यवहार ठप्प झाले. नोंदणीसाठी आलेल्या पक्षकार नागरिक यांची मोठी गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय पुण्यात आहे. मात्र, याचा सर्व्हर मुंबईमध्ये आहे. एनआयसिकडे हे काम देण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात वारंवार सर्व्हर डाऊन किंवा स्लो होण्याच्या घटना घडत असल्याने अधिकारीही वैतागले आहेत. प्रमुख अधिकाऱ्यांना हातामधील महत्वाची कामे सोडून सर्व्हर पूर्ववत करण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करावा लागत आहे.
पुण्यातील २७ नोंदणी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झालेली होती. शहराच्या विविध भागांमधून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि पक्षकार आलेले होते. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असल्याने मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये वाढ होत असते. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी विक्रीला प्राधान्य देतात. मात्र, सकाळपासून आलेल्या नागरिकांचा नोंदणी कार्यालयांबाहेर पुतळा झाला.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात सात ते आठ वेळा सर्व्हर डाऊन झालेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच इंटरनेटचा स्पीड कमी असणे, सर्व्हर स्लो चालणे ही उदाहरणे तर सततची आहेत. त्यामुळे शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभागाचे कामकाज धिम्या गतीने सुरू आहे.
बुधवारी सकाळपासून ताटकळत बसावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
विभागाचे कामकाज क्लाऊडद्वारे करण्यासाठी डाटा ट्रान्स्फरचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर डाटा कॉपी झाल्याने सर्व्हर डाऊन झाला आहे. तात्काळ किंवा तातडीची कामे असतील तर ती ऑफलाईन करता येऊ शकतील. कॉपी झालेला डाटा काढून जागा रिकामी झाल्यावर व्यवहार पूर्ववत सुरू होतील.- अनिल कवडे, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग