मुंबई - विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आश्वासनपूर्ती करण्याकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडीचे सरकार दिलासा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या पुढे कर्जमुक्ती देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात, त्यांच्यासाठीही काही तरी दिलासा देणारी बाब प्रत्यक्षात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.
मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना त्यांना कोणी वाली राहिला नाही. शेतकऱ्यांना मजबूत केले पाहिेजे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.