मनीषा म्हात्रे / मुंबईकमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार सध्या सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. मात्र आता निवडणूक आयोगाच्या निर्बंधांनंतर उमेदवारांना १९ फेब्रुवारीपासून सोशल मीडियावरील जाहीर प्रचारालाही लगाम घालावा लागणार आहे. निवडणूक आयोग यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेत आहे. सोशल मीडियावर जाहीर प्रचार करणे उमेदवाराला महागात पडू शकते. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर बंद होतो. त्यामुळे २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणाऱ्या १० महानगरपालिकांचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या १४ आॅक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही जाहीर प्रचाराला बंदी असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव ध.मा. कानेड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. ठरविलेल्या प्रणालीनुसार त्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील प्रचारालाही लगाम
By admin | Published: February 15, 2017 3:42 AM