लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव (पुणे) : पुनर्वसित माळीण गावात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेलेय रस्ते खचले, ड्रेनेजलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने रस्त्यावर पाणी वाहिले. घरांना तडे गेल्याने रहिवाशी घाबरले आहेत.८-१० कुटुंबे पुन्हा पत्र्यांच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर नवे माळीण गाव वसवून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यातील ६७ घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. मात्र, पहिल्याच पावसात गावाची दयनीय अवस्था झाली. शनिवारी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना व भिंतींना तडे गेले. घरांच्या पायऱ्या, गटारांचे चेंबर खचले, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या आहेत. अंगणवाडीजवळील मोठी भिंत पडल्याने शाळेला धोका निर्माण झाला आहे. भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. गावातील परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पुनर्वसित ‘माळीण’मध्ये भिंतींना तडे
By admin | Published: June 26, 2017 1:48 AM