मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील इंदिरा गांधी नगरमधील झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याने उघड्यावर पडलेल्या १२० झोपडीधारकांचे पुनर्वसन त्वरित संक्रमण शिबिरात करण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ रेल्वेच्या भूखंडावर इंदिरा गांधी नगर रहिवासी संघ वसाहत गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वास्तव्यास होती. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील सुमारे १२० झोपड्यांवर २८ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आल्याने झोपडीधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या झोपडीधारकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईसंदर्भात वायकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत यापूर्वी म्हणणे मांडले होते.दरम्यान, ही झोपडपट्टी शासनाच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांचे पुनर्वसन होण्यास पात्र आहे. संबंधितांकडे रहिवासासंदर्भात पुरावे उपलब्ध आहेत. शासनाच्या धोरणानुसार १ एप्रिल २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण आहे. अशा झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन शासनाच्या माध्यमातून करता येते. अशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे राज्यमंत्र्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)
१२० झोपडीधारकांचे संक्रमण शिबिरात पुनर्वसन करा
By admin | Published: March 04, 2017 1:57 AM