ठाणे : ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागामध्ये हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरण कारवाईमध्ये १०० टक्के बाधित झालेल्या व्यावसायिक बांधकाम धारकांचे पुनर्वसन त्याच परिसरातच करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. दरम्यान उपवन इंडस्ट्री येथे बाधित होणाऱ्या औद्योगिक गाळ्यांचे खारीगाव येथे जकात नाक्यासाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये फेरबदल करून तिथे इंडस्ट्रीयल बेल्ट तयार करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच मुंब्य्रामध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळात बाधित झालेल्या व्यावसायिक गाळे धारकांचेही पुनर्वसन करण्याचेही आयुक्तांनी ठरविले आहे. शहराच्या विविध भागामध्ये रस्ता रुंदीकरण मोहिम सुरू असून त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. बाधित व्यावसायिक गाळेधारकांचेही त्याच परिसरात त्यांचे पुनर्वसन करण्याची भूमिका घेतली असून पोखरण रोड नं. १ मध्ये १०० टक्के बाधित होणाऱ्या ५४ व्यावसायिकांचे पुनर्वसन दोस्ती विहार येथे उपलब्ध असलेल्या १६०० चौरस मीटर सुविधा भुखंडावर करण्यात येणार आहे. पोखरण रोड नं. २ मध्ये बाधित होणाऱ्या ११७ व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन त्याच रोडवर उपलब्ध असलेल्या १३०० चौरस मीटरचा सुविधा भूखंड, ग्लेंडल सोसायटीच्यासमोर दोन्ही बाजूला असलेली ५००० चौरस फुटाच्या महापालिकेच्या जागेमध्ये तसेच ग्लॅडी अल्वारीस रोडवर उपलब्ध असलेल्या १५०० चौरस मीटर जागेमध्ये करण्यात येणार आहे. म्हाडा वसाहतीमध्ये तोडलेल्या टपऱ्यांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी म्हाडाकडून प्राप्त झालेल्या सर्वे नं. २१४ मधील ३००० चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. इमारत क्र मांक ४० ते ४६ येथे सहा ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे.स्टेशन रोड परिसरातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या व्यावसायिक गाळे धारकांपैकी रेल्वे स्टेशन ते जुने महापालिका कार्यालय येथील बाधितांचे पुनर्वसन महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर, जुने महापालिका कार्यालय ते जांभळीनाका येथील बाधितांचे पुनर्वसन गुजराथी शाळेच्या आवारात, तर तीनहातनाका या परिसरातील बाधित गाळयांचे पुनर्वसन तीनहातनाका येथे मिनी मॉल बांधून करण्यात येणार आहे.।‘त्या’ हॉटेल मालकांना दिलासा >उपवन औद्योगिक वसाहतीमध्ये जे ३६ व्यावसायिक गाळे बाधित होत आहेत, त्यांचे पुनर्वसन खारीगाव येथे जकातनाक्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेच्या वापरात फेरबदल करून त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल बेल्ट बांधून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील इतर भागातील जे औद्योगिक गाळे बाधित होणार आहेत त्यांचेही पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येणार आहे.दरम्यान ७ ते ८ वर्षापासून पुनर्वसनासाठी महापालिकेचे उंबरठे झजिविणाऱ्या अनेक लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महापालिका आयुक्तांनी केवळ मानवतावादी दृष्टीकोनातून मार्गी लावला आहे. त्यामध्ये बाळकुम येथील रेनबो हॉटेलचा काही भाग ७ ते ८ वर्षांपूूर्वी तोडला होता. त्याचे पुनर्वसन व्हावे यासाठी त्या हॉटेलचा मालक अनेक वेळा महापालिकेत आला होता.
व्यावसायिकांचेही पुनर्वसन
By admin | Published: May 18, 2016 3:09 AM