ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 7 - वाहनचालकांना डोकेदुखी ठरणाऱ्या जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती सुधारणार आहे. यासाठी जुलै २०१६ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने निधीची तरतूद केली आहे. या निधीनुसार रस्ता कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील काही रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या रस्त्यावर वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. या संदर्भात जिल्ह्यातील सावजलिक बांधकाम उपविभागाच्या अहवालानुसार जिल्हास्तरावर प्राथमिक अंदाज पत्रक तयारही करण्यात आले. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने जुलै २०१५ च्या अर्थसंकल्पातच निधीची तरतूद केली आहे. या निधीतून रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार बेलखेड-मसलापेन-सोनाटी या मार्गावरील १३ ते १५ किलोमीटर दरम्यानच्या दोन किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी ५० लाख, मालेगाव तालुक्यातील मेडशी-चोंढी मार्गावरील सुरुवातीच्या दोन किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी ५० लाख, वनोजा-तऱ्हाळा-गणेशपूर-पोटी-मोहरी खडी-धामणी या मार्गावरील सुरुवातीच्या दीड किलोमीटर अंतरासाठी एक कोटी, वाशिम-शेलूबाजार या मार्गावरील दीड किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी एक कोटी, मानोरा-गव्हा-रतनवाडी या मार्गावरील अडिच किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी एक कोटी, तर कामरगाव-कारंजा-धोत्रा देशमुख या मार्गावरील एक ६ ते १० दरम्यानच्या ४ किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी १ कोटीची तरतूद मिळून जिल्ह्यातील उपरोक्त सहा रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतुद शासनाकडून करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामांना निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरुवात होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील काही रस्त्यांची कामे मागील आठवडाभरापासून सुरू करण्यात आलेली आहेत. या रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे म्हणून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून स्वत:च्या मार्गदर्शनात काम करून घ्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
वाशीममधील रस्त्यांची स्थिती सुधारणार
By admin | Published: November 07, 2016 5:12 PM