कोल्हापूर : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून निकालानंतर लगेचच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय केवळ ‘लोकमत’मुळेच घेतला, अशी कबुली देत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना होतो. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का, असा प्रश्न विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात ‘लोकमत’ने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का, याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
फेरपरीक्षा हा ‘लोकमत’चाच निर्णय -तावडे
By admin | Published: June 13, 2015 2:19 AM