कोल्हापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागलीच फेरपरीक्षा घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचविण्यात येईल, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत सोमवारी केलेली घोषणा म्हणजे ‘लोकमत’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीने २४ ते २६ मार्चदरम्यान ‘पुरवणी परीक्षा घ्या, नापासांचे वर्ष वाचवा’ ही तीन भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कर्नाटकमध्ये गेल्या १४ वर्षांपासून अशी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा तेथील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमध्ये परीक्षा घेतली जात असल्याने नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे पुरवणी परीक्षा कशी आवश्यक आहे हे आकडेवारीनिशी मांडले होते.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने २२ मे रोजी कोल्हापुरात आले असता या पुरवणी परीक्षेचे फायदे ‘लोकमत’ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. महाराष्ट्रातील हजारो नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी ही परीक्षा कशी गरजेची आहे, हेही त्यांना सांगितले होते. त्यावर त्यांनी सूचना खूप चांगली आहे.याचा निश्चितपणे विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तावडे यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आणि नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविण्याची संधी देऊन मोठा दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)
नापासांसाठी फेरपरीक्षा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याचे यश
By admin | Published: June 08, 2015 11:59 PM