मुंबई : एल. एच. हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी आरोपी असलेल्या दोन डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला आहे. या दोघांवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.जनरल सर्जन डॉ. वीणा सेवलीकर व कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुविन शेट्टी यांनी कनिष्ठ न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. हे दोन्ही डॉक्टर लोकल आॅथॉरायझेशन कमिटीचे सदस्य असल्याने त्यांनीच किडनीचे प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिली. त्यांच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या दोघांचाही जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सुरत येथे राहणारा ब्रिजेशकुमार जैस्वाल याला शोभा ठाकूर यांची किडनी देण्यात येणार होती. त्यासाठी बनावट कागदपत्र बनवून ब्रिजेशकुमार आणि शोभा पती-पत्नी असल्याचे दाखविण्यात आले. पोलिसांना याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी डॉक्टरांना रंगेहाथ पकडले. दोन्ही डॉक्टरांनी जामीन अर्जात म्हटले आहे की, आतापर्यंत त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले आहे. ९ आॅगस्टला पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला व दोषारोपपत्रही दाखल केले आहे.सकृतदर्शनी या दोन्ही डॉक्टरांविरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)
डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 4:56 AM