ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या सुसाइड नोटमध्ये नावे असल्याने चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या ठाणे महापालिकेतील चौघा नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. सध्या भूमिगत असलेल्या या नगरसेवकांपुढे मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याखेरीज पर्याय नाही. परमार आत्महत्या प्रकरणात सुसाइड नोटमध्ये सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे या चौघांची नावे असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाल्यावर त्यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वि.वि. बांबर्डे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जावर होणाऱ्या सुनावणीपूर्वी या चौघांच्या वकिलांनी गुरुवारी सकाळी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला होता. मात्र, ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होणे बाकी असताना आपण या अर्जाची सुनावणी करणार नाही, असे सांगून उच्च न्यायालयाने ठाण्यातील न्यायालयाकडे बोट दाखवल्याने दुपारी ३ वाजता बांबर्डे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या वेळी न्यायालयात पोलीस, वकील, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक यांची गर्दी जमली होती.चौघा नगरसेवकांच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी आपल्या अशिलास हेतुत: या प्रकरणात गोवण्यात येत असून काही व्यक्तींना जाणीवपूर्वक चौकशीपासून दूर ठेवल्याचा दावा केला. ठाणे महापालिकेत कथित गोल्डन गँग कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना होती, तर त्यांनी दीर्घकाळ कारवाई न करता वाट का पाहिली, असा सवालही त्यांच्या वकिलांनी केला. आपल्या अशिलांना महापालिका स्थायी समितीच्या तसेच महासभेच्या कामकाजात भाग घेण्याची संधी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.सरकारी वकिलांनी अर्जदार कुठे आहेत, अशी विचारणा करतानाच प्रारंभी परमार प्रकरणात जरी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल केले असले तरी फॉरेन्सिक अहवालानंतर चौघांची नावे उघड झाल्यावर केलेली कारवाई उचित आहे. तसेच या सर्व अर्जदारांवर यापूर्वी विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असल्याकडेही सरकारी वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. पोलिसांची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नसून कोणताही दबाव त्यांच्यावर नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर, न्यायाधीश बांबर्डे यांनी चौघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.सुधाकर चव्हाण यांच्या वतीने हेमंत सावंत, जगदाळे यांच्या वतीने गजानन चव्हाण, विक्रांत चव्हाण यांच्या वतीने राजन साळुंखे, नजीब मुल्ला यांच्या वतीने सुरेश पाचबोले यांनी तर पोलिसांचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या घराबाहेर फिल्डिंगभूमिगत चौघा नगरसेवकांच्या घरांबाहेर गुरुवारी पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, हे नगरसेवक व त्यांचे नातलग घरी नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून कागदपत्रे ताब्यात घेतली. नगरसेवकांच्या घरांबाहेर अहोरात्र बंदोबस्त असणार आहे. - वृत्त/४
चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2015 1:35 AM